Wednesday, June 29, 2011



आधुनिक जीवनशैली मुलांच्या मुळावर?
   नाथाश्रम निराधार स्त्रिया व मुलांसाठी काढले जातात. ते घराचा पर्याय नसले तरी अनेकांच्या नशिबी आश्रम हेच घर असतं. फसवणूक झालेल्या स्त्रिया, निराधार मुलं यांच्यासाठी आश्रम हा एक आधार असतो. स्त्रीला उपभोगाची वस्तू समजून तिची फसवणूक करणारे, तिच्या असहायतेचा फायदा घेणारे पुरुष हे  काही केवळ आजचं वास्तव नाही. म्हणूनच अनाथाश्रम आणि महिलाश्रम हे जुन्या काळापासून अस्तित्वात आहेत. १९व्या शतकात जोतिबा फुल्यांना नाडल्या आणि फसवल्या गेलेल्या विधवांसाठी आश्रम काढावा लागला होता. त्यांच्या प्रसूतीची सोय तिथे उपलब्ध होती. समाजाचं हे रूप एका विदारक वास्तवाकडे बोट दाखवतं. अनाथाश्रमांमधून सोडली जाणारी मुलं ही कुठल्या तरी घरात राहणाऱ्या आणि कुटुंबव्यवस्थेचा लाभ मिळालेल्या स्त्री-पुरुषांचीच मुलं असतात हे विसरता येत नाही.
    काही इलाजच उरत नाही म्हणून आपल्या मुलाला आश्रमात ठेवण्याचा निर्णय स्त्रिया घेत असतात. कधी फसवलं गेल्यामुळे समाजाकडून होणारी नाचक्की टाळण्यासाठी, कधी आर्थिक कारणांसाठी, तर कधी मुलाची जबाबदारी पेलण्याच्या स्थितीत नसल्याने, आश्रमावर भार टाकला जातो. कायद्यानुसार अशा मुलांचा सांभाळ करण्याचा अधिकार आश्रमांना असतो आणि पुढे या मुलांना दत्तक देऊन त्यांचं भविष्य बदलण्याचा प्रयत्नही आश्रम करत असतात. पण दरवेळी मजबुरीमुळेच मुलांना आश्रमाच्या दारात सोडलं जातं असं नाही. आजकाल स्त्रिया शिकून आर्थिक दृष्ट्या स्वतंत्र आणि स्वावलंबी बनल्या आहेत. अर्थात त्यांची तरीही फसवणूक होऊ शकते हा भाग वेगळा. पण अलीकडे सामाजात आणि जीवनशैलीत जे बदल होत आहेत, त्यामुळे एकूण मानसिकताच बदलत चालली आहे याचा प्रत्यय येत असतो. त्याचं प्रतिबिंब अनाथाश्रमांकडे येणाऱ्या मुलांना तिथे सोडण्यातही पडू लागलं आहे. अलीकडे एका मान्यवर इंग्रजी वृत्तपत्राने पुण्यातील अनाथाश्रमांमध्ये सोडल्या जाणाऱ्या मुलांबाबत प्रसिद्ध केलेली माहिती धक्कादायक वाटली तरी याच मानसिकतेचं दर्शन घडवणारी आहे.
    या बातमीनुसार, फक्‍त समाजाच्या गरीब स्तरातील अविवाहित आयाच आपल्या मुलांना आश्रमाच्या दारात नेऊन टाकतात असा कुणाचा समज असला तर तो काढून टाकलेलाच बरा. अलीकडे आपली मुलं आश्रमात ठेवून त्यांच्यावरचे सर्व हक्क सोडण्याची तयारी दाखवणाऱ्या तरुणी बऱ्या घरच्या, उत्तम नोकरीत असलेल्या, सुशिक्षित आणि शहरांमधून राहणाऱ्या असतात असं आढळलं आहे. पुण्यातल्या सोसायटी ऑफ फ्रेंड्स ऑफ ससून हॉस्पिटल (SOFOSH) या दत्तक संस्थेच्या संचालक माधुरी अभ्यंकर यांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांच्या संस्थेत २००९ या वर्षात आलेल्या ७० बाळांपैकी २१ बाळं अशा आयांनी सोडलेली होती. तर २०१० मध्ये या संस्थेत सोडण्यात आलेल्या ६४ बाळांपैकी २८ बाळं अशा तरुणींची होती. हे वास्तव खरोखरच काळजी करण्यासारखं आहे. पुण्यातल्याच भारतीय समाज सेवा केंद्र या दत्तक संस्थेतही गेल्या दोन वर्षांमध्ये ५० बाळांपैकी ४ बाळं अशा तरुण व आर्थिक दृष्ट्या सक्षम स्त्रियांनी सोडलेली होती. यामध्ये बरेचदा विद्यार्थिनी असतात असंही आढळलं आहे.
   आजकालच्या विशीच्या आतबाहेरच्या वयातल्या तरुणी हे पाऊल उचलतात त्यामागे लिव्ह इन रिलेशनशिपचं वाढलेलं प्रमाणही कारणीभूत आहे, त्याचाही हा परिणाम आहे असं दिसतं. अलीकडे शिक्षणासाठी मुलंमुली घराबाहेर, दूरच्या ठिकाणी हॉस्टेलवर राहतात. एक मुक्‍त आयुष्य अनुभवण्याचा आनंद ती लुटतात व यातूनच या तरुणी गरोदर राहतात. अगदी परदेशी विद्यार्थ्यांबाबतही असे प्रकार घडताना दिसतात. बरेचदा गरोदरपणाचं लक्षात येतं तेव्हा उशीर झालेला असतो. मग बाळाला जन्म देऊन नंतर त्याचा त्याग करण्याचं पाऊल उचललं जातं. एवढी शिकलेली असूनही या मंडळींना गर्भनिरोधक साधनं वापरण्याचं ज्ञान नसतं ही आश्चर्याचाच बाब आहे. ग्रामीण भागातल्या मुलींना हे ज्ञान नसणं एकवेळ ठीक म्हणता येईल, पण शहरात राहिलेल्या विद्यार्थिनी आणि नोकरी करणाऱ्या स्त्रीपुरुषांना ते नसावं? अर्थात अनेकदा आयत्या वेळी मुलाने लग्नाला किंवा जबाबदारी स्वीकारायला नकार देणं हेही कारण असतंच. कारण लग्न हा कौटुंबिक मामला मानला जातो आणि घरचे ठरवतील तेव्हा लग्नाला उभं राहण्याचा पवित्रा उचलला जातो. त्यामुळेही आयत्या वेळी असा नकार मिळतो. कधी प्रकृतीच्या कारणामुळे गर्भपात करणं कठीण असतं म्हणून मग मूल जन्माला घालण्याचा निर्णय घ्यावा लागतो.
    मुलाला संस्थेत सोडायला येताना अनेकदा तरुण व तरुणी दोघेही येतात. ती १८ ते २३ या वयोगटातली असतात. कधी त्यांच्या सोबत मित्र-मैत्रीण कुणी असतं, पालकांपैकी मात्र कुणी कधीच येत नाही असंही आढळतं. म्हणजे घरी पत्ता लागू न देता हे सारं गुपचुप करण्याकडे कल आहे असं आढळतं. विद्यार्थिनींमधील बाळंतपणाचं प्रमाण वाढलं आहे हे प्रसूतितज्ज्ञही मान्य करतात. तसंच कधी कधी बीपीओंमध्ये आणि आयटी क्षेत्रात काम करणारी जोडपीही असा निर्णय घेताना दिसतात. कारण वेळेअभावी मुलांचं संगोपन करण्याची समस्या त्यांच्यापुढे असते. बीपीओ कर्मचारी आणि खेळाडूंसारख्या काही नामवंत स्त्रियाही या मार्गाने गेल्याचं समजतं. बाळाला दत्तक देण्यापूर्वी त्याच्या आईवडिलांनी त्याला येऊन भेटावं यासाठी दोन महिन्यांची मुदतही दिली जाते. कदाचित ते पुनर्विचार करतील अशी आशा त्यामागे असते. मात्र विद्यार्थी आणि शहरी लोकांपैकी तर कुणीही एकदा बाळ संस्थेच्या ताब्यात दिलं की पुन्हा तिथे फिरकतही नाही, असा अनुभव SOFOSH मध्ये तरी आजवर आला आहे. 
    समाजाच्या आणि विशेषतः तरुण पिढीच्या मानसिकतेत होणाऱ्या बदलांचं दर्शन या बातमीतून घडतं. नैतिकतेचा विचार वगैरे बाजूलाच ठेवला, तरी आज व्यापारी प्रवृत्ती, व्यवहार आणि माणुसकीचा विसर अशा गोष्टी सहज स्वीकारल्या जाताना दिसतात. कुणाला भावनांमध्ये रस उरलेला नाही. नाइलाजाने असं स्वतःचं मूल सोडून देणं एकवेळ समजून घेता येईल. पण मूल ही स्वतःची जबाबदारीसुद्धा आहे याचा सहज विसर पडू देणाऱ्यांबद्दल काय बोलायचं? स्वतःसाठी मुक्‍त जीवनशैली निवडताना त्यातून जन्मणाऱ्या संततीचा विचार आधीच करण्याची समज शिकलेल्या लोकांना तरी असणं आवश्यक आहे. मनमोकळं जगण्याच्या हक्काबरोबर येणाऱ्या कर्तव्याचा विसर पडत गेला तर त्यामुळे अशा समस्या निर्माण होतात. मजबुरीमुळे असं पाऊल उचलणं वेगळं, पण ओढवून घेतलेल्या प्रसंगाच्या परिणामांचा विचार पुरेशा गांभीर्याने जेव्हा केला जात नाही तेव्हा चिंता वाटते.
    अलीकडे अशा घटना वाढल्याचं या निमित्ताने प्रकाशात आलं असलं तरी असे प्रकार पूर्वी थोड्याफार प्रमाणात होतच होते हेसुद्धा नमूद करायलाच हवं. मुंबईतल्या माटुंगा इथल्या श्रद्धानंद महिलाश्रमावर अचला जोशी यांनी लिहिलेल्या आश्रम नावाचं घरया गेल्याच वर्षी प्रकाशित झालेल्या पुस्तकातही स्वतःच्या  सुखासाठी आपलं मूल आश्रमात सोडणाऱ्या सर्वसामान्य स्त्रियांच्या आणि नामवंतांच्या कथा आहेतच. अलीकडच्या जीवनशैलीने आजच्या पिढीला अधिक बेदरकार बनवलं आहे हेही तितकंच खरं. जगण्याच्या औचित्याचा विचारच ही पिढी फार गंभीरपणे करत नाही की काय असं वाटायला लावणाऱ्या या घटना आहेत.

0 Comments:

Post a Comment

Subscribe to Post Comments [Atom]

<< Home