Thursday, June 30, 2011





यमुनेचं प्रदूषित वॉटर

http://www.esakal.com/esakal/20110101/images/5097923291829389441/5254871133479840331_Org.jpgस्त्रीशक्तीची जाणीव तशी सर्वांनाच असते. ती कुणी मान्य करतं; कुणी करत नाही. पण आता कुणाच्या मान्य करण्यावर ती अवलंबून नाही. सर्वसामान्य ते असामान्य अशा सगळ्याच वर्गातील स्त्रियांची ताकद आता नाकारून चालणार नाही...एकीकडं असं असतानाच दुसरीकडं स्त्रीची दुर्दशाही काही पूर्णपणे थांबलेली आहे, असं चित्र नाही. स्त्री ही अशी दोन कमालीच्या वास्तावांमध्ये आज जगत आहे. स्त्रीविश्‍वातील अशी सगळीच विराट आणि विकल स्पंदनं टिपली जातील.

   
सुखाने नांदत्या घराला आपण गोकुळ म्हणतो. कृष्णाच्या बाललीलांनी चैतन्यशील बनलेला परिसर, अशी गोकुळ-मथुरा-वृंदावनाची ख्याती आहे; म्हणूनच तर आनंदानं जगण्याऱ्या कुटुंबाला या परिसराशी आपण जोडतो... अर्थात असा निखळ आनंद साऱ्याच घरांमधून दिसत नाही, मग घराला पारखे झाले त्यांच्या निशिबी तो कुठून असणार? दुर्दैवाची गोष्ट म्हणजे, जनावरांपेक्षाही वाईट जीवन ज्यांना इतरांमुळे जगावं लागतं, अशा हजारो विधवा गोकुळ-मथुरा-वृंदावन असलेल्या ब्रजभूमीतच दिवस कंठत आहेत. अलीकडेच प्रकाशित झालेल्या संयुक्त राष्ट्रसंघाच्या (युनो) अहवालात ही माहिती पुन्हा नव्याने समोर आली आहे. पुन्हा नव्याने यासाठी म्हटलं की, हे जे भयावह वास्तव ब्रजभूमीत आहे, ते जुन्या काळापासून चालत आलंय; आणि त्याकडं डोळेझाक करून आपली भारतीय संस्कृती स्वत: महान असल्याचा दावा जगभर करत आली आहे!

युनोच्या सहकार्याने 'गिल्ड ऑफ सर्व्हिसेस' या स्त्रियांसाठी काम करणाऱ्या संस्थेनं ब्रजभूमीच्या परिसरात राहणाऱ्या विधवांच्या जीवनासंदर्भात एक सर्वेक्षण हाती घेतलं होतं. त्यातून बाहेर आलेले निष्कर्ष संवेदनशील माणसाला हादरवून सोडणारे आहेत. २१ व्या शतकातही या देशात घडणाऱ्या अनेक गोष्टी रानटी मनोवृत्तीची आणि पुरुषी दहशतीची आठवण करून देत आहेत आणि आपल्या 'थोर' हिंदू धर्माशी अशा गोष्टींचा संबंध पोचतो हे खूपच चिंताजनक आहे...
पतीच्या मृत्यूनंतर स्त्रियांच्या आयुष्याची जी परवड होते, तिचे असंख्य नमुने ब्रजभूमीत बघायला मिळतात. देशातल्या सुमारे चार कोटी विधवांना नवऱ्याच्या पाठीमागे कुणीच विचारत नाही वा थारा देत नाही. त्यांना कुठल्यातरी धार्मिक स्थळी नेऊन सोडलं जातं...आणि अशा विधवांपैकी किमान ४० ते ५० टक्के विधवा ब्रजभूमीच्या परिसरात आणि बनारसमध्ये आढळतात, असं हा अहवाल म्हणतो. वृंदावनात वैष्णवपंथीय मंदिरांमधून अशा विधवांची राहण्याची ठिकाणं आहेत. २५ ते ८० अशा वयोगटातल्या या विधवांचं लैंगिक शोषणही मोठ्या प्रमाणावर होतं आणि कधीतरी त्याबद्दल मिळणारा पैसाही तिथल्या विधवांसाठीच्या आश्रमांच्या चालकांची धन करतो. बालविधवांनाही इथं सोडून देण्याचं प्रमाण मोठं आहे.

सरकारतर्फे इथल्या विधवांना पेन्शन देण्याची योजना आहे; पण त्यासंदर्भातल्या गैरव्यवहाराचा पर्दाफाशही या अहवालाने केला आहे. तिथल्या अनेक विधवांना या पेन्शन योजनेबद्दल माहीतच नाही, तर काहीजणींना नावापुरतं जिल्हा कार्यालयातून उभं केलं जातं आणि बाकी अर्जांवर कोणतीही नावं टाकून पेन्शन हडप केली जाते, हे आता उघड झालं आहे. ब्रजभूमीच्या परिसरात चांगलं काम करणाऱ्या आणि स्त्रियांना खरा आधार देणाऱ्या संस्था-संघटनाही आहेत; पण त्यांचे हात तोकडे पडतात, हेही खरं. कारण नाडलेल्यांचं शोषण जास्तीत जास्त कसं करता येईल, यावर टपलेले लोक तिथे मोठ्या प्रमाणावर आहेत आणि धर्माशी निगडित संस्थांशी ते संबंधित असल्याने त्यांना आपोआपच एक ताकद मिळत असते.

युनोचा अहवाल प्रसृत झाला, तेव्हा मन विषण्ण झालं. विधवांची स्थिती आजही गेल्या काही शतकांप्रमाणेच असावी? याला जबाबदार कोण? किती वर्षं आपली तीर्थस्थळं आणि मंदिरं अशा पापांना संरक्षण देणार, असं वाटून गेलं. वृंदावनात आश्रमात येणाऱ्या विधवांमध्ये बंगाली विधवांची संख्या जास्त आहे, ही गोष्ट एकेकाळी स्त्रीसुधारणांमध्ये आघाडीवर असलेल्या बंगालला काळिमा फासणारी आहे; पण ती तेवढीच खरीही आहे. काही वर्षांपूर्वी 'वॉटर' चित्रपटाच्या चित्रीकरणावरून वादंग माजलं होतं, तेव्हां या गोष्टीची चर्चा झाल्यानंतर पश्‍चिम बंगाल सरकारने यासंदर्भात चौकशी करून काही उपाययोजना करण्याचा निर्णय घेतला होता. म्हणजे हे वास्तव खरं असल्याचं मान्यच केलं होतं एकप्रकारे; पण पुढं पावलं उचलली गेली नसणार...अन्यथा पुन्हा बंगाली विधवांच्या संख्येचा मुद्दा समोर आला नसता.

ज्ञानपीठविजेत्या आसामी लेखिका इंदिरा गोस्वामी यांनी आपल्या 'नीलकान्ती ब्रज' या कादंबरीतून वृंदावनातील विधवांच्या जिण्याचा आलेख मांडला आहे. त्या स्वत: पतिनिधनानंतर रामायणाचा तुलनात्मक अभ्यास आणि संशोधन करण्यासाठी वृंदावनला राहिल्या होत्या. एक विधवा म्हणून त्यांनी जे स्वत: अनुभवलं आणि आसपास पाहिलं, त्याचा उल्लेख त्यांनी आपल्या आत्मचरित्रात केलाच आहे. शिवाय वृंदावनातील विधवांचं जगणं चितारणारी कादंबरीही त्यांनी लिहिली. परवा युनोच्या अहवालाबद्दल वाचलं त्या वेळी इंदिरा गोस्वामींची आठवण म्हणूनच झाली...

आज समाज खूप बदलला आहे. स्त्रियांची स्थिती सुधारली आहे; असं आपण म्हणतो आणि काही प्रमाणावर ते खरंही आहे; पण सर्वांना ते लागू पडत नाही, हेही वारंवार प्रत्ययाला येतच असतं. असं घडतं कारण धर्माच्या नावाखाली कुप्रथांना खतपाणी घातलं जातं आणि व्यवहारी वास्तवामुळं दुसऱ्यावर निर्दयपणे अन्याय करण्याचा निर्ढावलेपणा राजरोस सुरू राहतो. मुळातच विधवा स्त्रीनं सती जाणं, ती जगलीच तर तिनं कधीच आनंदानं जगू नये, यासाठी तिच्यावर बंधनं लादणं, स्वत:चं आयुष्य तिच्यासाठी ओझं बनावं आणि हे ओझं आप्तांवरही पडतं, ही जाणीव तिच्या मनात जागी ठेवणं...अशा अनेक प्रथा असंवेदनशीलता आणि आर्थिक कारणांमुळेच निर्माण झाल्या. धर्माचा मुलामा देऊन विधवांना कोंडीत पकडण्याच्या अनेक क्‍लृप्त्या शोधण्यात आल्या. तिनं भुकेलं राहावं, फक्त कष्ट करावेत, स्वत:साठी जगूच नये हे पाहिलं गेलं. पूर्वी विधवांचं केशवपन सर्रास होत असे. ही प्रथा तरी संपावी यासाठी एकेकाळी महाराष्ट्रात सुधारक मंडळींनी जिवाचं रान केलं. आगरकरांना तर ही कुप्रथा समूळ नष्ट व्हावी, हे खूपच मनापासून वाटत होतं. "डोंगरीच्या तुरुंगातील आठवणी' लिहिताना त्यांनी तिथल्या कैदी स्त्रियांबद्दल लिहिलं आहे. अशी स्त्रियांविषयी मनापासून आस्था वाटणारी आगरकरांसारखी माणसं आज नाहीत की काय?
गंगा-यमुनेसारख्या पवित्र मानल्या गेलेल्या नद्यांना प्रदूषणाच्या विळखा पडला आहे, हे वास्तव आपण रोजच बघतो. हे प्रदूषण आता या पवित्र स्थळांच्या परिसरातून मानवी जीवनातून पसरत चाललं आहे...पसरत आलं आहे. या प्रदूषणाचा उगम धर्माचा चेहरा असलेला दुष्ट प्रथांमध्ये आणि माणुसकीचा विसर पडलेल्या समाजामध्ये आहे, याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. अशा प्रवृत्तींमुळंच हेही खरं की, ब्रजभूमीतल्या विधवांची स्थिती दारुण बनते...पण या विधवा देशातल्या इतर ठिकाणाहूनही आलेल्या असतात. कुंभमेळ्यात अशा विधवांबरोबरच घरातील वृद्ध, आजारी किंवा नको असलेल्या माणसांना (स्त्री-पुरुष दोघांनाही) आजही खुशाल सोडून दिलं जातं. पवित्र पर्वांच्या मिषाने अशी पर्वणी लादली जाते...पावित्र्यच प्रदूषित होत असतं ते असं...!
संबंधित बातम्या
(२ जानेवारी २०११)

0 Comments:

Post a Comment

Subscribe to Post Comments [Atom]

<< Home