Thursday, June 30, 2011



तिच्या करियरची वाट
    भारतीय स्त्रीच्या दृष्टीने, तिला शिक्षणाच्या दिशेने घेऊन जाण्याची प्रेरणा हे अत्यंत महत्त्वाचं पाऊल ठरलं होतं. या प्रेरणेला पहिली साद दिली ती महात्मा जोतिबा फुले यांनी. फुल्यांना मनापासून या कार्यात साथ देणाऱ्या सावित्रीबाई फुले यांची जयंती नुकतीच आपण साजरी केली. त्यांची आणि त्यांच्या बहुमोल कामाची आठवण म्हणून आपण तीन जानेवारी रोजी महिला मुक्ती दिवस साजरा करतो. सावित्रीबाईंनी अंगावर झेललेले दगड आजच्या स्त्रीसाठी वरदान ठरले आहेत हे तिने नेहमीच लक्षात ठेवलं पाहिजे. फुल्यांनी हाती घेतलेल्या शाळेच्या आणि स्त्रियांसाठी आधारगृह चालवण्याच्या कामाला सावित्रीबाईंनी मोठाच हातभार लावला. आजची स्त्री शिक्षणाच्या वाटेवर रुळली आहे, वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये कर्तृत्व गाजवत आहे आणि जीवनाच्या अनेक आघाड्यांवर जिद्दीने लढते आहे....या साऱ्याची सुरुवात  तेव्हाच झाली होती. 
   शिक्षणाने स्त्रीला स्वतःचा आवाज दिला, ओळख दिली आणि एक अवकाश मिळवून दिला. शिक्षणापाठोपाठ आर्थिक स्वावलंबन स्त्रीच्या जीवनात स्थिर झालं. स्त्रीने घराबाहेर पडून काम करणं आणि पैसे कमावणं आज नवीन राहिलेलं नाही. वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये स्त्रिया आज काम करताना दिसतात. या क्षेत्रांमध्ये खालच्या स्तरापासून वरिष्ठ पदांपर्यंत त्यांचा शिरकाव झालेला दिसून येतो. केवळ नोकरीच नव्हे, तर स्त्रिया आज व्यावसायिक आणि औद्योगिक क्षेत्रांमध्येही आघाडी घेताना दिसतात. स्वतःची गुणवत्ता सिद्ध करत त्या प्रगती साधत आहेत.
घरच्या आणि बाहेरच्या अशा दोन्ही आघाड्यांवर त्यांची लढाई चाललीच आहे. सर्वसाधारणपणे  घराला अग्रक्रम देण्याचा स्वभाव असलेली भारतीय स्त्री अनेकदा यामुळेच कार्यक्षेत्रात पुढे जाण्याची संधी गमावून बसते. त्याबद्दल तिला खंत वाटत राहते पण पुन्हा कधीतरी आणखी एखादी संधी मिळेल या उमेदीने ती नव्याने कामाला सुरुवात करते. पण आजही स्त्रियांना कामाची संधी कमी मिळते अशी तक्रार खूपदा ऐकू येते. काम करणाऱ्या स्त्रियांचे म्हणूनही काही प्रश्न असतात. कामाच्या ठिकाणची सुरक्षितता हा त्यापैकीच एक. तसंच ऑफिसात वरची पदं मिळवण्याबाबतही स्त्रियांना अनेकदा डावललं जातं किंवा त्यांच्याबाबत कडक व काटेकोर निकष लावले जातात. खालच्या किंवा मध्यम श्रेणीतल्या पदांबाबत तितकासा प्रश्न येत नाही पण उच्च पदांबाबत येतो असं स्त्रियांचा अनुभव सांगतो. स्त्री जितकी वर जाईल तितकी तिला आपली गुणवत्ता कसोशीने सिद्ध करावी लागते. पुरुषापेक्षा जास्त दृढतेने आपल्या कामात लक्ष घालावं लागतं. वरच्या दिशेने जाताना तिथे असलेला अदृश्य अडसर तिला सतत जाणवत असतो. तो दिसून येत नाही, पण तिच्यासाठी तो तिथे असतो..बँका, कारखाने, उद्योगसंस्था, प्रशासकीय क्षेत्र कुठेही जा, स्त्रियांना हा अनुभव येण्याचं काही चुकत नाही. अतिशय कार्यकुशल आणि आपल्या विषयात माहीर असलेल्या स्त्रियांनाच फक्त ही वाटचाल काहीशी सोपी ठरते. पण त्यांच्याही बाबतीत, त्यांच्या तज्ज्ञतेच्या संदर्भात शंका नसल्या तरी त्यांच्या धोरणात्मक कौशल्यांबाबत किंवा त्यांच्या व्यावसायिक क्षेत्राच्या जाणकारीबद्दल खात्री नसते, असंही आढळतं. थोडक्यात, स्त्रियांना आपली हरतऱ्हेची गुणवत्ता अधिक कसोशीने सिद्ध करावी लागते.
   तरीही अर्थातच भारतीय स्त्रीची काम करण्याची इच्छा आणि तयारी कुठेही कमी पडत नाही. उलट जगाच्या तुलनेत भारतीय स्त्रीकडेच काम करण्याची अधिक जोरदार आकांक्षा आहे. अलीकडेच या संदर्भात माहिती हाती आली की, आपलं काम आणि करियर यांना महत्त्व देणाऱ्या भारतीय स्त्रियांची संख्या वेगाने वाढते आहे. सेंटर फॉर वर्कलाईफ पॉलिसी या अमेरिकास्थित संस्थेने केलेल्या पाहणी व संशोधनावर आधारित आकडेवारीत असं आढळलं आहे की भारतातल्या ८० टक्के स्त्रियांना आपल्या कामाबाबत आणि कार्यक्षेत्राबाबत आकांक्षा आहेत आणि त्यात पुढे जाण्याची दुर्दम्य इच्छा त्यांच्या ठायी आहे. याउलट अमेरिकेतल्या  केवळ ५२ टक्के स्त्रियांनीच या तऱ्हेचे स्वारस्य दर्शवल्याचं आढळून आलं. भारतात होणारी आर्थिक-औद्योगिक प्रगती एक प्रकारे सामाजिक मानसिकतेतही बदल घडवू लागली आहे असं यावरून सिद्ध होतं.
   सेंटर फॉर वर्कलाईफ पॉलिसी ही संस्था जगभरातल्या कॉर्पोरेट विश्वातील कामकाजविषयक धोरणं आणि कायद्यांच्या संदर्भात संशोधन व अभ्यास करून उत्पादकता, कर्मचारी व त्यांच्या कुटुंबांचा विकास अशा विविध बाबतीत कंपन्यांसोबत काम करते. या संस्थेच्या ब्रेन ड्रेन टास्क फोर्स या मुख्य प्रकल्पांतर्गत जगभरातल्या १९० देशांतील सुमारे ५६ कंपन्यांमधून अशा तऱ्हेचं काम चालतं. त्यांना आढळलं आहे की जगभरात एकूणच पुरुषाइतकीच स्त्रियांची मिळकतही वेगाने वाढते आहे. अगदी शांघायसारख्या अत्याधुनिक शहरापासून दुसऱ्या कोणत्याही छोट्या  शहरापर्यंत सगळीकडे मनात एक महत्त्वाकांक्षा घेऊन स्त्रिया व्यावसायिक कामांच्या क्षेत्रात उतरू लागल्या आहेत. या संस्थेने अलीकडे भारतात केलेल्या संशोधनातून असं निष्पन्न झालं की इथल्या स्त्रियांमध्ये जबरदस्त गुणवत्ता तर आहेच, पण त्याचबरोबर घराबाहेर पडून काम करण्याची त्यांची इच्छाही आहे. याबाबतीत अमेरिकन स्त्रियांनाही इथल्या स्त्रियांनी मागं टाकलं आहे. भारताची अर्थव्यवस्था आता वेगाने वाढते आहे. तिला गती देण्यात उच्चशिक्षित स्त्रियांचा सहभाग निश्चित आणि  महत्त्वाची भूमिका निभावू शकेल.
   एक वेगळा दिलासा आणि शाबासकी भारतीय स्त्रियांच्या पदरात टाकताना इथल्या व्यवस्थेतील आणि सामाजिक घडीतील काही त्रुटीही या संशोधनाने समोर आणल्या आहेत. भारतीय स्त्रियांना सांस्कृतिक आणि सामाजिक आव्हानांचा सामना करावा लागतो, जसा तो अमेरिकन स्त्रियांना करावा लागत नाही असं त्यात म्हटलं आहे. त्याचप्रमाणे भारतीय स्त्रियांच्या व्यावसायिक वाटचालीला अडथळा ठरणाऱ्या काही गोष्टींचा निर्देश यात करण्यात आला आहे, त्या म्हणजे कामाच्या ठिकाणी असणारा स्त्रीपुरुष भेदाभेद, सुरक्षितता, कामासाठी करावा लागणारा प्रवास आणि कामाच्या वेळा. अर्थातच भारतीय स्त्री यातल्या अनेक प्रश्नांना सामोरी जात आली आहे. आपल्या परीने या समस्यांची उत्तरं शोधण्याचा प्रयत्न ती करते किंवा हे प्रश्न राहणारच आहेत हे स्वीकारून ती आपला मार्ग त्यांच्यासकट चालू लागते. बरेचदा तिच्यापुढच्या अडचणी घरच्यांनी सहकार्य केलं तर सहज सुटणाऱ्या असतात, पण या सहकार्याची हमी तिला नसते. याचं कारण घराची जबाबदारी, व्यवस्थापन तिलाच सांभाळावं लागतं. ते तिचंच काम आहे ही जाणीव इतरांप्रमाणे तिच्या स्वतःच्याही मनाशी पक्की झालेली असते. हे काम ती मनापासून करतेही, तिचा भार हलका करावा असा विचारही इतरांच्या मनाला शिवत नाही तेव्हा तिला ते डाचू लागतं. तरीही ती एकाच वेळी दोन्ही आघाड्या सांभाळण्याचा प्रयत्न कसोशीने करते. कारण संधी थांबून राहत नसते हे तिला माहीत झालं आहे.
    घरात आणि बाहेर दोन्हीकडे ती राबते. घरच्या अडचणींचा पाढा ऑफिसात वाचून चालत नाही. आणि तिथल्या कामाबद्दल घरात तक्रार करून उपयोग नसतो. बाईपणाचा फायदा घेऊन सवलती मिळवणाऱ्या स्त्रियाही असतात, नाही असं नाही. पण घरात आणि बाहेरही मनापासून कामात रस घेणाऱ्या स्त्रिया जास्त प्रमाणात आढळतात. घरात स्त्री करत असलेल्या कामाचं मोजमाप होत नाही. अनेकदा ते काम आहे हेच मानलं जात नाही. म्हणूनच जी पूर्णवेळ गृहिणी असते तिला जर कुणी विचारलं की तुम्ही काय करता, तर ती सांगते, छे.. मी काहीच करत नाही. अशीही घरं असतात जिथे स्त्रीच्या कामाचा वाटा पुरुषही उचलताना दिसतो. ते काम आपलंही आहेच ही भावना बाळगून वागणारे पुरुषही असतात, पण त्यांची संख्या कमी आहे.  
   घरासाठी आणि मुलांसाठी आपल्या करियरमधल्या संधी स्त्रिया बाजूला ठेवताना दिसतात. अनेकदा त्यांना जर मदत आणि पाठिंबा मिळाला तर त्या संधी स्वीकारूनही घर सांभाळू शकतात, पण तसं अपवादाने घडतं. घरकाम प्रत्यक्षात करावं न लागलं तरी घराचं एकूण नियोजन तिलाच करावं लागतं. मात्र नियोजन आणि व्यवस्थापन करणं तिला जमेल की नाही ही शंका तिच्या ऑफीसमध्ये मात्र घेतली जाते. घरचं काम पत्नी बघत असली तरी मी बाहेरचं  सगळं सांभाळतो असं अनेक पुरुष सांगत असतात. ते सारंच खोटं नसतं. यामुळेच बरेचदा केवळ गृहिणींनाच नव्हे तर नोकरी करणाऱ्या स्त्रियांनाही बाहेरची म्हणजे आर्थिक स्वरूपाची कामं करावी लागत नाहीत. त्यांना ती जबाबदारी पुरुषावर सोपवण्याची सवय होऊन जाते. त्याचे दुष्परिणामही कदाचित मग या स्त्रियांनाच भोगावे लागतात. आर्थिक फसवणुकीचे गैरप्रकार घडताना आपण नेहमीच पाहत असतो. आपल्या कमाईतला एक रुपयाही स्वतःच्या मर्जीनुसार खर्च करता येत नाही अशाही स्त्रिया पाहण्यात येतात. याला आर्थिक स्वावलंबन कसं म्हणावं हा प्रश्न पडतो. चूल आणि मूल या संकल्पनेतून स्त्री मुक्त झालेली नाही असं म्हटलं जातं. पण समाजच या संकल्पनेला कवटाळून बसला आहे हे त्यामागचं खरं कारण आहे. घर दोघांचं तशी तिथली कामंही दोघांची हे जोवर पुरुष पटवून घेत नाही तोवर स्त्रीवरचा कामाचा ताण कमी होणार नाही. स्त्रीला करियरच्या उत्तम संधी उपलब्ध असताना पुरुष घर सांभाळण्याचं काम स्वीकारतो आणि बायकोला तिच्या कार्यक्षेत्रात भरारी घेण्याची मोकळीक उपलब्ध करतो हे अपवादात्मक चित्रही आता अनोळखी राहिलेलं नाही.
   तरीही कौटुंबिक आव्हानांच्या काळात स्त्रीच्या करियरचा बळी जाण्याचं प्रमाण आजही मोठं आहेच. एकदा गेलेली नोकरी पुन्हा मिळत नाही आणि नवी संधी आपल्या सोईनुसार उपलब्ध होतेच असं नाही. यासाठीच सुमारे वीस-बावीस वर्षांपूर्वी स्त्रियांसाठी स्वेच्छेने अर्धवेळ नोकरी उपलब्ध करण्याच्या कल्पनेवर महाराष्ट्र सरकार विचार करत होतं आणि या संदर्भात गो. रा. परांजपे यांच्या नेतृत्वाखाली एक समितीही नेमण्यात आली होती. याबाबत पुढे मात्र काही घडलं नाही. या कल्पनेला पाठिंबा मिळू पाहत होता तसा विरोधही झालाच होता. पण काही विशिष्ट काळापुरती याप्रकारे अर्धवेळ नोकरी पत्करण्याकडे बऱ्याच स्त्रियांचा कल दिसून आला होता. कारण नोकरी टिकण्याची शाश्वती त्यात होती.
  आता बदलत्या काळात नोकऱ्यांच्या शाश्वतीची, सेवाज्येष्ठतेची आणि एकच नोकरी जन्मभर करत राहण्याची संकल्पना सार्वजनिक क्षेत्राच्या बाहेर तरी बदलू पाहत आहे. अगदी ऐन भरात असलेलं करियर काही काळासाठी बंद करून घर व मुलांमध्ये लक्ष घालायचं आणि नंतर पुन्हा नव्याने  काम करायला लागायचं हा पायंडा पडू लागला आहे. काही जणींना तरी हे शक्य होत आहे. अलीकडे पुरुष मंडळीही याप्रकारे नोकरीचं क्षेत्र बदलणं किंवा नोकरीतून बाहेर पडून वेगळं काही करू बघणं असे प्रयोग करताना दिसतात. एकाच कामात आयुष्यभर अडकून पडण्याची संकल्पना मागे पडत चालली आहे. टाटासारखे काही समूह घरासाठी करियर सोडून दिलेल्या किंवा शिक्षण असूनही घरा-संसारासाठी मुळातच काम करण्याच्या फंदात न पडलेल्या स्त्रियांसाठी नवी संधी उपलब्ध करण्याचा प्रयोग करताना दिसतात. स्त्रीला मध्यम वयातही आपलं करियर उभं करण्याचा आत्मविश्वास असे उपक्रम देत असतात. करियरच्या बाबतीत आजची स्त्री नव्या वळणावर उभी आहे. तिला या वाटेवर अधिकाधिक यश मिळण्यासाठी घरातून मिळणाऱ्या साथीची आणि सहकार्याची.
(९ जानेवारी २०११)

0 Comments:

Post a Comment

Subscribe to Post Comments [Atom]

<< Home