नो वन किल्ड आरुषी
अबोध आणि अल्लड कळी असावी तशी दिसायची ती. तिच्या गूढ हत्येनंतर तिचे फोटो आणि व्हिडिओ क्लिपिंग्ज चॅनेलवरल बघताना मनात फक्त हळहळ असायची. एक सुंदर, अस्फुट कलिका अकाली खुडली गेली आणि तिच्या हत्येभोवती अनेक शंकाकुशंकांचं वादळ घोंगावू लागलं. तिच्या वर्तनाबद्दल गावगप्पा सुरू झाल्या. वेगवेगळ्या लोकांवर तिच्या खुनाचा संशय घेतला गेला आणि तरीही १६ मे २००८ च्या सकाळी उघडकीस आलेल्या तिच्या हत्येच्या घटनेला दोन-अडीच वर्षं लोटल्यावरही खुनाचे नेमके धागेदोरे उघड झाले नाहीत. उलट पुन्हा तिच्या वडिलांवर संशयाचा ठपका ठेवून, तरीही पुरेशा पुराव्याअभावी त्यांना अटक करण्याची असमर्थता दर्शवून, हे प्रकरण बंद करण्याचा निर्णय घेऊन सीबीआय मोकळी झाली.
आरुषीला जे मरण आलं ते अनेक सवाल उपस्थित करतं. पहिल्यापासूनच तपासात काहीतरी गफलत जाणवत होती. नेमकं सत्य कधीच बाहेर येऊ नये यासाठी आटापिटा चालल्याचं स्पष्टपणे दिसत होतं. आरुषीबरोबरच घरातील एक नोकर हेमराज याच्या झालेल्या हत्येमुळे या प्रकरणाने अनेक वळणं घेतली. संशयाची सुई निरनिराळ्या लोकांच्या दिशेने अक्षरशः गरागरा फिरत राहिली. इतर तीन नोकरांवर आधी संशय होता, पण ते तिघेही दोषी असल्याचं सिद्ध होऊ शकलं नाही. आरंभी पोलीस तपासाच्या वेळी आरुषीच्या वडिलांनीच हत्या केल्याचा संशय बोलून दाखवण्यात आला होता. सीबीआयही पुन्हा त्याच निष्कर्षाकडे निर्देश करते आहे. तिच्याकडे पुरेसा पुरावा मात्र नाही..म्हणूनच तर केस फाईलबंद करण्याचं पाऊल उचलण्याचं जाहीर करून सीबीआय मोकळी झाली. तर तलवार दांपत्य ही केस बंद करू नका या आग्रहाखातर न्यायालयात गेलं. त्यांचा दावा न्यायालयाने फेटाळला आणि सीबीआयच्या फाईलबंदीवरील सुनावणीची प्रक्रिया हाती घेण्याचा निर्णय तेवढा घोषित केला. आता येत्या २१ जानेवारीला पुढील सुनावणी होणार आहे. राजेश तलवार यांच्यावर आरोपपत्र दाखल केलेलं नसल्याने ते कायद्याच्या नजरेतून आरोपी ठरत नाहीत एवढंच. सीबीआय फाईल बंद करतेय ती पुरावे हाती नसल्याने. तरीही सीबीआयच्या मतेही राजेश तलवार हेच हत्येमागे असावेत असा संशय आहे. तर ते स्वतः मात्र केस बंद करू नका असं म्हणत आहेत असं चित्र समोर दिसतं आहे. कारण कदाचित हेच असावं की त्यांच्य विरुद्धचे पुरावे सीबीआयच्या हाती लागण्याची कधीही शक्यता नाही हे त्यांना पक्केपणी माहीत आहे.
हत्येचा तपास करण्यासाठी वेगवेगळे परिस्थितिजन्य पुरावे नष्ट करण्यात आले, हेमराजचा मृतदेह घराच्या गच्चीवर सापडला त्या गच्चीची किल्ली पोलिसांना देण्यास राजेश तलवार यांनी नकार दिला, फोरेन्सिक तपासणीसाठी गेलेल्या काही गोष्टी बदलण्यात आल्या आणि तपास करताना पोलिसांवर दबाव टाकण्यात आला अशा अनेक गोष्टी तलवार यांच्याविषयीच्या संशयाला बळकटी देणाऱ्या आहेत हे मात्र नक्की. अर्थात पोलीस आणि सीबीआय यंत्रणांमधील त्रुटीही यामुळे स्पष्ट होतात. तलवार दांपत्याला यात पूर्णपणे गोवता येऊ नये यासाठीची धडपडही यामागे असू शकते. संशय, पुरावे, तपासयंत्रणांच्या चुका याबद्दल न्यायालय समर्थपणे निर्णय घेईलच. पण आरुषीच्या हत्येने त्यापलीकडचेही अनेक महत्त्वाचे मुद्दे उपस्थित होतात.
एका अबोध वयातील मुलीला अशा तऱ्हेच्या दुर्दैवी घटनेला सामोरं जावं लागणं हे किती क्रूर आहे. हा तथाकथित ‘ऑनर किलिंग’चा प्रकार असण्याची दाट शक्यता आहे. तरीही तो दडपला जातो आहे. नेमकं सत्य उद्या उघडकीस येईल वा येणारही नाही, पण या घटनेने समाजाच्या धारणांबरोबरच कोवळ्या वयातील मुलामुलींच्या भावविश्वाचा आणि जगण्याचा वेगळा पैलू पुढे आणला आहे. अलीकडे मुलींच्या वयात येण्याचा कालावधीही अलीकडे सरकला असून तो आणखी कमी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तशात माध्यमांशी सलगी आणि दोस्ती असणाऱ्या आजच्या मुलांच्या हातात आधुनिक साधनं आली आहेत. एसएमएस आणि एमएमएसवरून परस्परांच्या संपर्कात राहणं हे या पिढीसाठी नेहमीचंच आहे. पण अनेकदा या साधनांचा गैरवापर केला जातो. अश्लील चित्रण करून ते मोबाईलवरून पाठवणं, यूट्यूबसारख्या माध्यमातून प्रसिद्ध करणं हे प्रकार लहान वयातही हाताळले जाताना दिसतात. कोवळ्या वयात नको त्या गोष्टी करताना अनेकदा त्यांचा पूर्ण अर्थही मुलींना कळत नसतो. तशात माध्यमांवरून अनेक गोष्टी मुलांपर्यंत येत असतात. लहान मुलांना न शोभणारे अन् न कळणारे हावभाव व नृत्यप्रकार हौशीने त्यांच्याकडून करवून घेतले जातात. असं सगळं अवतीभोवती असताना मुलामुलींनी आपल्यातलं निष्पाप बालपण मात्र हरवू देऊ नये ही मोठ्यांची अपेक्षा असते. या सगळ्यापासून बोध घेण्याची वेळ आता आली आहे. आपण काय करतोय, त्याचे परिणाम कोणते संभवू शकतात याची कल्पना नसताना अनेकदा मुलंमुली काही गोष्टी करत असतात. यात मग लैंगिक संबंध ठेवण्यापासून काहीही असू शकतं. अज्ञान वयातील मुलीशी झालेला लैंगिक संबंध मुलीच्या संमतीने झाला असला तरी असा संबंध ठेवणारा पुरुष कायद्याच्या नजरेत बलात्कारी अपराधीच असतो. मात्र मुलगी गुन्हेगार ठरू शकत नाही. आणि बलात्कारासारखे गुन्हे नेहमी स्टेट (सरकार) विरुद्ध आरोपी असे चालतात. तो कायदा आणि सुव्यवस्थेचाही प्रश्न असतो. असं असताना आरुषीच्या प्रकरणी जर तिच्या लैंगिक चाचण्यांबाबतचे पुरावे बदलले गेले असतील किंवा हे प्रकरण दडपण्यासाठी प्रयत्न झाला असेल तर ते फार गंभीर आहे.
मुलींच्या अजाणतेपणाचा फायदा अनेकदा घरातील किंवा ओळखीतील लोकच घेत असतात हेही आपण बघत असतो. अशावेळी मुलींच्या हातून आगळीक घडली किंवा त्यांचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न झाला तर त्याला सामोरं जाताना वडीलधाऱ्यांनी अनेक पथ्यं पाळणं आवश्यक ठरतं. स्वतः न्यायाधीशाच्या भूमिकेत जाऊन तडकाफडकी अपराध्याला शिक्षा द्यावी तसं टोकाचं पाऊल उचलणं सर्वस्वी अयोग्य आहे. अनैतिक समजल्या जाणाऱ्या वर्तनाला कायदा हातात घेऊन टोकाची शिक्षा फर्मावणं अलीकडे फार वाढलं आहे. ‘ऑनर किलिंग’ अशा शब्दात एकप्रकारे उदात्तीकरणच केलं जातं. अधिकारपदांवर असलेल्या व्यक्ती आणि खाप पंचायतीसारख्या संघटित संस्था बेलगामपणे कृती करताना आणि या कृतीचं समर्थनही करताना दिसतात. आरुषीच्या संदर्भात अशा तऱ्हेचंच काही घडलं असण्याची दाट शक्यता आहे. ज्या पद्धतीने पुरावे नष्ट करण्यात आले त्यात डॉक्टरी व्यवसायातील जाणकारी आवश्यक होती हे स्पष्ट दिसत असल्यामुळे राजेश तलवार आणि पत्नी नूपुर तलवार यांचा सहभाग नाकारता येत नाही.
मुली आणि स्त्रियांच्या असुरक्षिततेची समस्या अलीकडे खूपच वाढली आहे. आजकालच्या तरुणतरुणींच्या मोकळ्या वागण्यातूनही गैरप्रकार घडतात. नववर्षाच्या पार्टीत मद्याच्या पेल्यात गुंगी आणणारं औषध मिसळून लैंगिक संबंध करण्याच्या घटनाही घडतात. आरुषीच्या प्रकरणी सीबीआय अर्जावर सुनावणी सुरू असताना आणखी एका १८ वर्षीय तरुणीचा मृतदेह दिल्ली पोलिसांच्या हाती लागला आहे. प्रियदर्शिनी मट्टूच्या संदर्भात तसंच स्पष्टपणे आणि डोळ्यांदेखत घडलेल्या जेसिका लालच्या हत्येबाबतही खूप दडपशाही झाली होती. मुख्य आरोपी सुटले होते. पण प्रसारमाध्यमांच्या पाठपुराव्यामुळे या दोनही प्रकरणांचा फेर तपास झाला आणि अपराध्यांना शिक्षा झाली. आता या प्रकरणावर ‘नो वन किल्ड जेसिका’ हा चित्रपटही आला आहे. आरुषीबाबत मात्र दुर्दैवाने ‘नो वन किल्ड आरुषी?’ असा प्रश्न विचारावा लागत आहे. आरुषीला न्याय मिळणारच नाही का?
(१६ जानेवारी २०११)


0 Comments:
Post a Comment
Subscribe to Post Comments [Atom]
<< Home