Thursday, June 30, 2011



गौरी, गौरी, कुठवर आलीस?
  देवाच्या दारात सारे सारखेच, असं आपण म्हणतो, पण देवळाच्या दारात मात्र साऱ्यांना समान वागणूक मिळत नाही असा अनुभव आजही येतो. हलक्या समजल्या गेलेल्या जातींना मंदिरबंदी कित्येक शतकं होती आणि मंदिरप्रवेशासाठी लढा देण्याचे कैक दाखले इतिहासात दिसतात. आज भारतातील हिंदू देवालयांमधून सगळ्यांना प्रवेश खुला करणारा कायदा अस्तित्वात असला तरी त्याची बूज न राखता व्यवहार होत आहेत असंही बरेचदा आढळतं. केवळ ठरावीक जातींनाच नव्हे, तर स्त्रियांनाही विशिष्ट देवांच्या देवळांमधून प्रवेश न देण्याची परंपरा आपल्याकडे शतकांपासून आहे. तिला आव्हान देण्याचा विचार आजवर स्त्रियांनीही फारसा कधी केला नाही. अलीकडे मात्र अशा तऱ्हेच्या बंधनांना झुगारलं पाहिजे असा विचार पुढे येऊ लागला आहे.
  महाराष्ट्रात स्त्रियांना प्रवेश निषिद्ध असलेलं मुख्य देऊळ आहे कार्तिकेयाचं. शनी शिंगणापूर या अहमदनगर जिल्ह्यात असलेल्या गावातील शनीच्या देवळाच्या चौथऱ्यावरून स्त्रियांना शनिदेवाचे दर्शन घेण्यास मज्जाव आहे. त्याविरुद्ध स्त्रीसंघटनांनी आंदोलनही केलं होतं. कारण हा भेदभाव करणं घटनेतील समानतेच्या तत्त्वाविरुद्ध आहे अशी त्यांची भूमिका होती. दुसरं उदाहरण आळंदीचं. स्त्रियांना तिथल्या अजानवृक्षाखाली बसून ज्ञानेश्वरी वाचण्यास मनाई  होती. आळंदीला साहित्य संमेलन झालं त्यावेळी आंदोलन होऊन ही प्रथा बंद पाडण्यात आली होती. महाराष्ट्रात कार्तिकेयाच्या देवळात स्त्रीवर्गाने न जाण्याची प्रथा फार पूर्वीपासून आहे. लहान मुलींनाही तिथे प्रवेश दिला जात नाही.
  दक्षिणेत मात्र तसं नाही, तिथे कार्तिकेयाच्या मंदिरात महिला जात असतात.       मात्र अय्यप्पाच्या देवळात स्त्रियांना प्रवेशबंदी आहे. कुमारिका आणि मासिक पाळी संपलेल्या स्त्रियांनाच फक्त या देवळात प्रवेश दिला जातो. गेल्या अनेक वर्षांपासून या प्रथेविरुद्ध मतप्रदर्शन केलं जात आहे. स्त्रीसंघटनांनीही हा प्रश्न हाती घेतला होता. तसंच उदारमतवादी आणि स्त्रीपुरुषसमतावादी पुरुषही या प्रथेला विरोध करतात. पण जुनाट मतांच्या देवळातील पुजाऱ्यांना आणि इतरही अनेकांना हे मान्य नाही. उलट स्त्रियांना या परिसरात  पूर्णच बंदी करण्यात यावी असा मतप्रवाह उसळी मारू लागला आहे. या देवतेची विशिष्ट आख्यायिका आहे. अय्यप्पा हा भस्मासुराचा वध करण्यासाठी घेतलेले विष्णूचं मोहिनीरूप आणि शिव यांच्या संयोगातून जन्मला आहे अशी कथा आहे. दरवर्षी संक्रांतीच्या काळात मकरज्योतीचं दर्शन घेण्यासाठी केरळातील शबरीमलय इथे असलेल्या अय्यप्पाच्या सुप्रसिद्ध मंदिराची यात्रा असते. बराच काळ आधीपासून पुरुष मंडळी अय्यप्पाचं व्रत अंगीकारतात आणि शबरीमलय यात्रा करून ते समाप्त करतात. ब्रह्मचर्याचं पालन या काळात करावं लागतं आणि म्हणून स्त्रीचं शक्यतो दर्शनही नको अशी यामागची एक भूमिका आहे. मध्यंतरी जयमाला या दाक्षिणात्य अभिनेत्रीने, आपण १९८७ साली एप्रिल महिन्यात शबरीमलय इथल्या अय्यप्पा मंदिराच्या गाभाऱ्यात गेलो होतो आणि तेथील मूर्तीचा चरणस्पर्श केला होता असं जाहीर करून खळबळ उडवून दिली होती. नवऱ्याला आजारपणातून बरं करण्यासाठी ही प्रार्थना आपण केली होती असंही तिने म्हटलं होतं. त्यावेळी तिचं वय २७ वर्षांचं होतं, म्हणजे या मंदिरात प्रवेश न करण्याच्या वयोगटात ती मोडत होती. तिच्या या गौप्यस्फोटानंतर केरळात फारच मोठं वादळ उठलं आणि तिच्यावर कायदेशीर कारवाईही करावी कारण तिने कायदा मोडला आहे असा दबाव टाकला जाऊ लागला. केरळ हे परस्पर विसंगत गोष्टी असलेलं राज्य आहे. तिथे धर्मातीततेचा पुरस्कार करणाऱ्या कम्युनिस्ट पक्षाचं सरकार आणि अत्यंत सनातनी धार्मिकता दोन्ही गोष्टी एकाच वेळी आढळतात. यावेळी मात्र सरकारी आणि प्रशासकीय पातळीवरून या गोष्टीची दखल घेण्यात आली. दरम्यान, जयमालाने या कृत्याबद्दल माफी मागितली. पण भाविक हिंदूंच्या भावना दुखावल्या गेल्याबद्दल तिला शिक्षा झाली पाहिजे हा आग्रह मंदिर व्यवस्थापनाकडून घेतला गेला वगैरे घटनाक्रम घडत राहिले.
   नव्या आणि बदलत्या वातावरणात तसंच भारतीय घटनेनेही समानतेचं तत्त्व मान्य केलं असल्याने स्त्रिया आणि पुरुष यांच्यात असा भेदभाव करणं योग्य नाही अशी भूमिका घेऊन मंदिरप्रवेशाचा आग्रह धरणारे आहेत. केरळातील राज्य सरकारचाही स्त्रियांना मंदिरप्रवेश देण्यास पाठिंबा आहे. संबंधित खात्याचे मंत्री तर म्हणालेच की, जिथे जिथे पुरुष प्रवेश करू शकतो, तिथे तिथे कायद्याने आणि नैतिकदृष्ट्या स्त्रीही प्रवेश करू शकलीच पाहिजे. पण राहुल ईश्वर या मंदिर प्रवक्त्याने मंदिर विश्वस्ताच्या वतीने या गोष्टीला विरोध केला आहे. या संदर्भात एक समिती आता गठित करण्यात आली असून यथावकाश जो निर्णय लागायचा तो लागेलच. शबरीमलयसारखाच गुरुवायूर मंदिराबाबतही मध्यंतरी वाद उद्‍भवला होता. एकेकाळी या देवळात दलितांना प्रवेश मिळावा म्हणून कम्युनिस्ट नेते गोपालन यांनी लढा उभारला होता. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते वायलर रवी यांच्या मुलाचा विवाह तिथे झाला. रवी यांची पत्नी ख्रिश्चन आहे आणि तीही या विवाहाला उपस्थित असल्याने वादंग निर्माण झालं होतं. तसंच बुद्धधर्मीय असलेले श्रीलंकेचे अध्यक्ष महेंद्र राजपक्षे यांच्या पत्नी गुरुवायूर मंदिरात गेल्या तेव्हाही वाद घडला होता. म्हणजे लिंग आणि धर्म दोन्हींचा निकष लावून मंदिरबंदी करण्याकडे धर्ममार्तंडांचा कल दिसून येतो.
   मुळात मंदिरात विशिष्ट गटाला प्रवेश नाकारण्यामागे  काय हेतू असू शकतो हा विचार केला पाहिजे. मंदिरात येणारा कोणीही देवतेचा अवमान करण्यासाठी नक्कीच येत नाही, तरीही त्यास तिथे येऊ दिलं जात नसेल तर ते नक्कीच आक्षेपार्ह आहे. तसंच विशिष्ट जात-धर्म किंवा स्त्री असणं हे मंदिर प्रवेश नाकारण्याचं कारण होऊ शकत नाही. त्यामुळे उलट राज्य घटनेची बेअदबी होते. दुसऱ्यावर श्रेष्ठत्वाचा अधिकार गाजवण्याची जी प्रवृत्ती माणसात असते त्याचाच आविष्कार अशा तऱ्हेच्या बंदीत स्पष्टपणे दिसतो. हजारो वर्षांपासून स्त्रिया आणि दलित यांना भेदबावाची वागणूक दिली गेली. आपण पुरुष आहोत एवढेच एक कारण आपण श्रेष्ठ असण्यासाठी पुरेसे आहे असं एका मोठ्या पुरुषवर्गाला वाटत आलं आहे. त्याची परिणती आपण संपूर्ण समाज पुरुषप्रधान बनण्यात होताना अनुभवलं आहे आणि अनुभवत असतो. शबरीमलय किंवा शनी शिंगणापूरसारखी आणखीही उदाहरणं असतीलच. अशा प्रकरणात पुरुषसत्ता आणि धर्मसत्ता हातात हात घालून येत असल्यामुळे दिसून येणारा प्रभाव हा बराच टिकून राहणारा असणार हे उघड आहे. म्हणूनच, या परंपरा कितीही अन्यायकारक असल्या तरी त्यांच्याविरुद्ध बोलण्यास फार कुणी पुढे येत नाही. धार्मिक दहशत मनांवर राज्य करत असते या गोष्टीचा मग फायदा उठवला जातो. एक तऱ्हेची हुकूमशाही यातून प्रस्थापित होत जाते. विशेषतः दक्षिणेकडील अनेक मंदिरांमधून असणारी खास प्रकारच्या पोशाखाची सक्ती हीसुद्धा यामुळेच अस्तित्वात आली आहे.
    ही जी स्त्रियांना दूर ठेवण्याची मानसिकता आहे ती पुरुष हा अधिक पवित्र आहे या समजुतीतून आली आहे. स्त्रियांना मासिक पाळी येते हे एक कारण यासाठी सांगितलं जातं. वास्तविक पाहता आज स्त्रियांची मासिक पाळी म्हणजे पूर्वीसारखा बाऊ राहिलेला नाही. या काळात स्त्री अपवित्र असते हा समजच नाकारण्याची भूमिका अनेक स्त्रीपुरुष आज घेताना दिसतात. पूर्वी सारखी शिवाशिव या काळात पाळली जात नाही. पूर्वीची प्रथा स्त्रियांना रोजच्या कामापासून आराम देण्याच्या हेतूने होती असं गोंडस कारण दिलं जातं. पण ते किती फोल आहे ही गोष्ट या काळात पायली पायली धान्य निवडण्यासारखी आणखीही इतर सुकी पण कष्टाची कामं करणाऱ्या तेव्हाच्या बायांनाही पक्की माहीत होती.
    त्या काळातही मासिक पाळीकडे स्वच्छ नजरेने बघण्याची वृत्ती होती. काही घरांमधून शुक्रवारची किंवा गौरीची सवाष्ण दरवर्षी तीच असे, तिचा मासिक पाळी तेव्हा चालू असली तरीही. एका आजीबाईंना त्याबद्दल कारण देताना ऐकलंय. त्या सांगत होत्या, मग, गौरी पण बाईच आहे ना, तिला नाही येत दर महिन्याला?” तरीही मनावर शतकानुशतकांच्या परंपरेचा पगडा असल्याने आजही बऱ्याच स्त्रिया मासिक पाळीच्या काळात देव किंवा मंदिर यापासून दूर राहणं निवडतात. अलीकडे, ही गोष्ट नाकारून, तिचा कोणताही ताण मनावर न घेता आचरण ठेवणाऱ्या स्त्रियाही मोठ्या प्रमाणावर दिसू लागल्या आहेत. त्या या काळात स्वतःला अपवित्र मानत नाहीत. देवळात जाण्याचं टाळत नाहीत. सश्रद्ध स्त्रियाही या भूमिकेपर्यंत आल्या आहेत, मग देव न मानणाऱ्यांची गोष्टच वेगळी. (देव माना किंवा न माना तुम्हाला देवळात जायला कोणी अडवू शकत नाही. किंवा ज्यांना जायचं आहे त्यांना वाटेल त्या कारणासाठी अडवू नका असं म्हणण्याचा त्यांचा हक्क कुणी नाकारू शकत नाही.)  जी मी रोज असते तीच याही काळात असते, मग मी अपवित्र आहे असं मी मूर्खासारखं  का म्हणायचं, असा विचार आजची स्त्री करू लागली आहे आणि ते स्वागतार्ह आहे. तेव्हा, केवळ मासिक पाळी येण्याच्या वयोगटात असणं हे तर मंदिरप्रवेश नाकारण्याचं कारण होऊच नये. अन्यायाची कारणं कधी सबळ नसतातच!
(२३ जानेवारी २०११)
   



0 Comments:

Post a Comment

Subscribe to Post Comments [Atom]

<< Home