Thursday, June 30, 2011




इजिप्तमधील सिस्टरहूड

http://a1.sphotos.ak.fbcdn.net/hphotos-ak-snc6/hs059.snc6/168954_494017012675_586357675_6435755_1025940_n.jpg

http://blog.foreignpolicy.com/files/egypt_women.jpg





Women were leading some of the chants during the Feb. 1 protests in Cairo, Egypt.








 
    जिप्तमधल्या लढ्याला मिळालेलं यश ही एक ऐतिहासिक घटना आहे. या लड्याचा दबाव वाढत गेला तेव्हा होस्नी मुबारक यांनी आता पुन्हा आपण निवडणूक लढवणार नसल्याचं जाहीर केलं, तरी लगेच सत्ता सोडण्याची मात्र त्यांची तयारी नव्हती. मात्र त्यांना अखेर नमावं लागलं आहे. मुस्लिम ब्रदरहूड ही इजिप्तमध्ये बंदी असलेली आंतरराष्ट्रीय संघटना होस्नीविरोधी लढ्यात आक्रमकपणे उतरली. तरीही या सगळ्या आंदोलनात एकही इस्लामी घोषणा दिली गेली नाही हे त्याचं वैशिष्ट्य ठरलं आहे. या संपूर्ण लढ्यात इजिप्तच्या महिलांचा असलेला सहभागसुद्धा महत्त्वाचा ठरला. एरवी इजिप्त हा फार मागास प्रवृत्तीचा देश नसला तरी तिथल्या महिलांबाबत पारंपरिक दृष्टिकोनच बाळगला जात होता. म्हणूनच इजिप्तमधल्या आंदोलनातली महिलांची भूमिका वैशिष्ट्यपूर्ण ठरते. होस्नी मुबारक यांच्यानंतरचा इजिप्त मुस्लिम धर्मवादी लोकांच्या हातात जाईल अशी भीती न बाळगता, आपणही भविष्यातील संक्रमणाच्या प्रक्रियेचा एक भाग बनणार आहोत हा आत्मविश्वास मनात घेऊन तिथल्या महिला या लढ्यात उतरल्या होत्या, असं या आंदोलनाच्या एकूण बातम्यांवरून दिसलं. तिथल्या सरकारी टीव्हीने मात्र, आंदोलनात स्त्रियांचा लैंगिक छळ झाल्याच्या वार्ता पसरवण्याचा प्रयत्न केला.   
   कैरोतल्या तहरीर स्क्वेअरमध्ये लाखोंच्या संख्येने जमलेल्या आंदोलनकर्त्यांमध्ये महिलाही मोठ्या प्रमाणात उतरल्या हे चित्र जगाने पाहिलं. इजिप्त हा काही स्त्रियांना मोकळीक घेऊ देणारा देश नव्हे. तो तसा पारंपरिक देशच आहे. तरी तिथल्या स्त्रियांना पुरुषांप्रमाणे कायदेशीर आणि आर्थिक हक्क राहिले आहेत, असं इतिहास सांगतो. म्हणजे निदान सैद्धान्तिक दृष्ट्या तरी तिथे पूर्वीपासून स्त्रियांना कायद्याने बरेच अधिकार बहाल केले होते. मालमत्तेचा हक्कही त्यांना होता आणि विवाहाच्या करारातही त्यांना पुरुषाच्या बरोबरीने विवाह अन् घटस्फोटाचा हक्क असे. विवाह ही फार महत्त्वाची गोष्ट मानली जात असे. आजही काही बाबतीत हा देश पारंपरिक असला, तरी शिक्षण, नोकरी या गोष्टी तिथल्या महिलांसाठी नव्या नाहीत हेही खरंच. या आंदोलनात स्त्रिया पुरुषांच्या बरोबरीने रस्त्यावर उतरल्या. सार्वजनिक ठिकाणी स्त्रीला पारंपरिक परिवेशातच तिथे वावरावं लागतं. तिथल्या नव्वद टक्के महिला हिजाब वापरतात. महिलांना राजकीय आरक्षण असूनही फक्त १.८ टक्के महिला तिथल्या असेंब्लीपर्यंत पोचल्या आहेत. गेल्या वर्षी तिथल्या संसदेत स्त्रियांसाठी ६४ नवीन जागा निर्माण करण्याचा कायदा करण्यात आला. त्याआधीच्या निवडणुकीत फक्त १२ स्त्रिया निवडणुकीला उभ्या राहिल्या होत्या.  
  महिलांचं अस्तित्व नोकऱ्यांमध्येही दिसून येतं पण लठ्ठ पगाराच्या नोकऱ्या पुरुषांकडे अधिक प्रमाणात जातात. खासगीकरणाच्या धोरणांचा फटकाही स्त्रियांना बसतो. सामाजिक सेवा, शिक्षण, नर्सिंग आणि वैद्यक, औषधनिर्माण अशा ठिकाणी महिलावर्ग जास्त आढळतो. कमी कौशल्याची पदं महिलांकडे जातात. आणि अनेकदा ही पदं हंगामी असतात. जागतिक मंदीच्या काळात नोकऱ्यांच्या ठिकाणी स्त्रीवर्गाला फटका बसला, तसा यानंतरच्या काळातही तो बसू शकतो. उद्योगक्षेत्रातही स्त्रिया धडपडत असतात. पण हे प्रमाण फक्त १८ टक्के आहे, तर नोकरी आणि स्वयंरोजगारात २८ टक्के महिला आहेत. कायद्यानुसार सरकारी आणि सार्वजनिक क्षेत्रात स्त्रियांना बाळंतपणाची रजा देणं, मुलांसाठी पाळणाघरं काढणं आणि तान्ह्या मुलांसाठी त्यांना कामकाजाच्या वेळेत सवलत देणं या गोष्टी बंधनकारक असल्यामुळे, स्त्रियांना कामावर ठेवणं महागडं आहे अशी भावना तिथे आहे. आर्थिक संकटाच्या काळात मग स्त्रियांच्या नोकऱ्यांवर गदा येणं हे तिथे स्वाभाविकपणे घडतं. तरीही, इजिप्तशियन स्त्री ही घराबाहेर पडून काम करते आहे हे महत्त्वाचं. शिक्षण आणि इंटरनेटसारखी माध्यमं यामुळे तिथल्या स्त्रिया स्वतःच्या आकांक्षा, तक्रारी बोलून दाखवू लागल्या आहेत आणि या आंदोलनात त्यांचा असलेला सहभाग हा या मुक्तीच्या वाटेवरचाच हुंकार आहे.
  तरुण पिढी तर नेट सॅव्ही असल्यामुळे या माध्यमाचा उपयोग ती स्वतःचे विचार आविष्कृत करण्यासाठी करते. तरुण स्त्रिया ब्लॉग आणि ऑनलाईन रेडिओच्या माध्यमाचा वापर करून बंधनांवर मात करण्याचा आणि समानतेची लढाई लढण्याचा मार्ग अवलंबत आहेत. तिथल्या तीस टक्के महिला इंटरनेटचा वापर करतात. अर्थात नेट वापरणाऱ्या या महिला मुख्यत्वेकरून उच्च वर्तुळातल्या आहेत हेही खरंच. नेटवर अनामिक राहूनही मनोगत मोकळेपणाने व्यक्त करता येतं याचा लाभ स्त्रिया घेताना दिसतात. स्त्रियांबाबत होणारा अन्याय आणि भेदभाव हा त्यांच्या ब्लॉगलेखनाचा मुख्य विषय असतो. दालिया ज़ियादा ही ब्लॉगर आपल्या ब्लॉगमध्ये ओमरा या पवित्र स्थळी आम्हा महिलांना जवळच्या नात्याती पुरुष (वडील, भाऊ, नवरा, मुलगा) सोबतीला असल्याशिवाय प्रवेश दिला जात नाही, त्याबद्दल लिहिते. तिचं म्हणणं हे की माझे वडील हयात नाहीत, माझ्या भावांना सोबत येण्यात रस नाही आणि मला नवरा नाही, तर मी काय करायचं? एक अनामिका स्वतःच्या व्यसनाधीन भूतकाळाबद्दल लिहिते. अरबी पुरुषांचा मुलींच्या कौमार्याबद्दल जो अत्याग्रह असतो त्याबद्दलही तिने ब्लॉगमध्ये लिहिलं आहे. स्त्रियांना इजिप्तमधील समाज जी वागणूक देतो त्यावरही स्त्रिया लिहीत असतात. कोंडलेला श्वास झटकून टाकून मोकळ्या वातावरणात जगण्याची इच्छा घेऊन तिथल्या महिला राजकीय बदलातून सामाजिक बदलाची वाटचाल सुरू होण्याची आशा बाळगून आहेत. सध्याच्या आंदोलनाबद्दलही बऱ्याच ब्लॉग्सवर लेखन केलेलं सापडतं.   
  विमेन ऑफ इजिप्त या फेसबुकवरच्या ग्रुपने ताज्या संघर्षात सहभागी झालेल्या स्त्रियांचे फोटो असणारी गॅलरी तयार केली होती. स्त्रीपुरुषांनी परस्परांचे हात हातात घेणं हे सुद्धा तिथे सहन केलं जात नाही, तिथे एक वृद्ध स्त्री एका सैनिकाच्या गालांचं चुंबन घेतानाचं छायाचित्र फेसबुकवरच्या आल्बममध्ये प्रसिद्ध झालं होतं. या आंदोलनात फेसबुक आणि ट्विटरसारख्या नेटवर्किंग साईट्सचा वापर झाला असल्याची चर्चा आहेच. अस्मा महफ़ूज़सारखी महिला विकासाच्या चळवळीतली तरुणी गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक चळवळीच्या क्षेत्रात काम करते आहे. तिने तरुण स्त्रियांना नेटच्या माध्यमातून संघटित करण्याचा प्रयत्न केला आणि या लढ्यातही तिच्या प्रयत्नांचा महत्त्वाचा वाटा राहिला आहे. तहरीर स्क्वेअरमध्ये तरुण स्त्रियांप्रमाणे वयोवृद्ध महिलाही जमल्या, जमत असत. डॉ. नावल एल सादावी यांच्यासारखी आघाडीची इजिप्तशियन स्त्रीवादी कार्यकर्त्री वयाच्या ८०व्या वर्षी या आंदोलनात उतरली. ही महिला गेल्या अनेक वर्षांपासून स्त्रियांची सुंता करण्याची जी क्रूर प्रथा आहे त्याविरुद्ध लढते आहे. मुबारक यांना गुन्हेगार मानण्यात यावं अशी तिची मागणी होती. तर मारवा राखा नावाची गरोदर तरुणी सातवा महिना चालू असतानाही या निदर्शनांमध्ये सहभागी झाली. ती तर म्हणते, मी गरोदर नसते तर कदाचित मी घरीच बसून राहिले असते. पण आता माझ्या पोटातल्या बाळाचं भवितव्य मला घरी बसू देत नाहीए. त्याच्यासाठी मी इथे आले आहे. तर अॅना डे ही मूळची अमेरिकन तरुणी आंदोलन टिपण्यासाठी कैरोला गेली होती तिने या आंदोलनकर्त्या स्त्रियांबद्दल लिहिलं आहे. स्त्रियांची संख्या मोठी असली तरी पुरुषांच्या मानाने कमी होती, मात्र तिथल्या स्त्रियांनी कॅम्पेनच्या माध्यमातूनही खूप काम केलं असं ती म्हणते. त्याचप्रमाणे या स्त्रियांनी आंदोलनकर्त्यांना अश्रुधुरापासून होणारा त्रास कमी करण्यासाठी पेप्सीच्या बाटल्या पुरवूनही मदत केली, असं डे हिने नोंदवलं आहे. आंदोलकावर अश्रुधुराचा मारा केला जात होता. अश्रुधुराचा त्रास होऊ नये म्हणून पेप्सी आणि पाण्याचा वापर परिणामकारक ठरतो. म्हणून या स्त्रिया कार्समधून भरपूर पेप्सी व पाणी आणून त्यांचं वाटप करत होत्या असं डे हिने म्हटलं आहे.
   मुस्लिम ब्रदरहूडचा या लढ्यातील सहभागामुळे अनेकांना उद्याच्या काळाबद्दल अनिश्चितता वाटते. त्यात स्त्रियांचे हक्क आणि स्वातंत्र्य यावर बंधनं येतील अशी भीतीही काहीजण व्यक्त करत आहेत. कारण मुस्लिम देशांमधून स्त्रियांना मोकळा श्वास घेता येणं कठीण होत चालल्याचं चित्र आज बऱ्याच ठिकाणी आहे. पाकिस्तानातील स्त्रीविरोधी कायद्यावर आवाज उठवणाऱ्या सलमान तासीर यांना तिथल्या धर्मवाद्यांनी ठार मारल्याची घटना ताजी आहे. पीपीपीच्या नेत्या शेरी रहमान यांनी अलीकडे धर्मविरोधी कृत्य करणाऱ्यांबाबत लागू असणाऱ्या कायद्यात दुरुस्ती करून, त्यातील फाशी देण्याच्या शिक्षेची तरतूद मागे घेण्याचा बदल सुचवला होता. पण त्यांना हे विधेयक मागे घेणं भाग पाडण्यात आलं आहे. आपण हा कायदा पूर्ण रद्द करा असं म्हणतच नव्हतो, फक्त आपण निरपराधी आहोत हे सिद्ध करण्याची संधी आरोपीला देण्यात यावी अशी आपली भूमिका असल्याचं रहमान यांनी स्पष्ट केलं आहे. मात्र त्यांना दबावामुळे आपलं पाऊल मागे घ्यावं लागलं आहे. इजिप्तमध्येही अशा तऱ्हेचे प्रसंग उद्या उभे राहू शकतात अशी भीती व्यक्त होताना दिसते. मात्र तिथल्या बहुतेक स्त्रियांना तसं वाटत नाही. त्या येणाऱ्या काळाबाबत आशावादी आहेत आणि पुढेही आपल्या हक्कांसाठी लढण्याची त्यांची तयारी आहे. मुस्लिम महिलांनी प्रथमच बाहेर पडून अशा प्रकारची हिंमत आणि जिगर दाखवली आहे. त्यांच्या संघर्षाचं चीज व्हावं अशीच सदिच्छा आपण बाळगली पाहिजे.

(२० फेब्रुवारी २०११)


0 Comments:

Post a Comment

Subscribe to Post Comments [Atom]

<< Home