Thursday, June 30, 2011


  

गोष्ट जोतिबाच्या लेकांची
   रूपन पाठक नावाच्या महिलेने लैंगिक छळाला कंटाळून राजकिशोर केसरी या बिहारमधील भाजप आमदाराला भोसकलं...उत्तर प्रदेशातल्या नरेश द्विवेदी नामक बसप आमदाराने एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार केला...मुंबईच्या आयआयटीमधील प्राध्यापक एस. के. गुप्ता यांनी लैंगिक छळ केल्याचं उघड झाल्याने त्यांना सक्तीची निवृत्ती पत्करावी लागली....अशा प्रकारच्या कैक बातम्या गेल्या अनेक वर्षांपासून आपल्यावर वेगवेगळ्या माध्यमांमधून अक्षरशः आदळत असतात. भ्रष्टाचाराप्रमाणे स्त्री-अत्याचारही सार्वत्रिक बनला आहे, असं म्हणून आपण आपल्या कामाला लागतो आणि हे सारं बदलायला हवं अशी इच्छाही व्यक्त करतो. मात्र नेमकं काय करायचं याची उकल न झाल्याने अस्वस्थता तेवढी मनात धुमसत राहते....यात बदल कसा होईल, की नाहीच होणार? प्रश्नांची मालिका मनात घोंघावत राहते..
   स्त्री-अत्याचार करणारा पुरुष तसा का वागतो, त्याला कशामुळे असं वागताना काहीच वाटत नाही अशा प्रश्नांचा मागोवा घेऊन बदल घडवण्याचा मार्ग शोधणं ही खूप कठीण आणि अशक्यप्राय वाटणारी प्रक्रिया आहे. पुरुषांची मानसिकता बदलणं हा यावरचा उपाय आहे, मात्र ते कसं घडेल हे अनेकदा उमजत नाही. पण सारंच निराशाजनक चित्र नाही आणि स्त्रीला समजून घेणारा, तिला सन्मानाने वागवणारा पुरुष ही फँटसी नाही असं आश्वासन देणाऱ्या खुणाही आपल्या अवतीभवती दिसतात हा केवढा तरी मोठा दिलासा आहे. पुरुषांचं या दृष्टीने प्रबोधन करणं, त्यांच्या मनातल्या प्रश्नांची उकल करण्याचा प्रयत्न करणं आणि त्यांना अधिक संवेदनशील बनवणं असे उपक्रम राबवणाऱ्या हरीश सदानी आणि त्यांचे सहकारी यांची ओळख करून घेणं इथे उचित ठरावं. अलीकडेच हरीश सदानी यांना महाराष्ट्र फाउंडेशनचा पुरस्कार त्यांच्या या समाजाभिमुख कार्यासाठी प्रदान करण्यात आला. स्त्री-पुरुष समतेच्या तत्त्वाला हातभार लावणारं काम हरीश गेल्या अनेक वर्षांपासून करत आहेत. मेन अगेन्स्ट व्हायोलन्स अँड अॅब्युज (मावा) या संघटनेचे संस्थापक सदस्य असलेले हरीश सदानी स्त्री-पुरुष समतेकडे वाटचाल होण्याच्या दृष्टीने उपयुक्त काम हाती घेऊन त्यात स्वतःला झोकून देऊन वेगवेगळे उपक्रम राबवत आले आहेत. स्वतः सिंधी समाजातील असूनही हरीश कोणत्याही मराठी माणसाप्रमाणे उत्तम मराठी जाणतात. टाटा समाज विज्ञान संस्थेत एमएसडब्ल्यू करताना स्त्रीसंघटनेत काम केल्यामुळे स्त्रीबाबत होणारी हिंसा त्यांना विशेषत्वाने जाणवली आणि या संदर्भात काहीतरी करायला हवं याची निकड त्यांना भासू लागली. सप्टेंबर १९९१ मध्ये “Wanted Men who believe that wives are not for battering and could do something to stop and prevent it” असं वृत्तपत्रातलं आवाहन वाचून एकूण २०५ जणांनी त्याला फ्रतिसाद दिला, त्यात हरीश होते. त्यानंतर त्यांनी मावा संघटनेच्या स्थापनेत सहभाग घेतला आणि एका नव्या विधायक उपक्रमाची सुरुवात झाली. तेव्हापासून स्त्रीपुरुष नातेसंबंध, लैंगिकता, लैंगिक आरोग्य, पुरुषांमधील हिंसक वृत्ती अशा मुद्द्यांवर हरीशचं काम चालू आहे. पुरुषांच्या कार्यशाळा आयोजित करून या विषयांवर चर्चा-संवाद घडवून आणणं हे या उपक्रमाचं मुख्य स्वरूप. पुरुषस्पंदनं–माणूसपणाच्या वाटेवरचीहा दिवाळी अंक हे जणू या कार्याचं मुखपत्रबनून गेलं आणि त्यात हरीश यांचा महत्त्वाचा वाटा  आहे.   
  स्त्रीपुरुषसमतेच्या तत्त्वाचा पुरस्कार करताना पुरुषांचं प्रबोधन होत नसल्याने त्यांच्या मानसिकतेत बदल घडत नाही आणि मग त्यातून अनेक प्रश्न निर्माण होतात याचं भान मनात रुजल्यामुळे हरीश यांच्या कामाची दिशा निश्चित झाली. अर्थात त्यांच्यासोबत त्यांचे अनेक सहकारीही होतेच. ऑगस्ट २००६ मध्ये युवामैत्री या उपक्रमाने हरीशच्या कामाला एक नवी दिशा मिळाली. ग्रामीण भागात पुरुषामध्ये स्त्रीपुरुषविषयक विविध पैलूंबाबत जागरूकता निर्माण करण्याचं काम करण्यासाठी त्यांना एक फेलोशिप मिळाली होती. या उपक्रमासाठी त्यांनी पुणे जिल्ह्यातल्या सासवड, जेजुरी अशा परिसरांची निवड केली. पुढे, लोणावळा, कोल्हापूर अशा अनेक ठिकाणी या तऱ्हेच्या कार्यशाळा पार पडल्या. तिथल्या कार्यशाळांमधून भेटलेले तरुण आणि आलेले अनुभव खूपच आशादायक चित्र निर्माण करणारे आहेत, आश्वासक भविष्याचं स्वप्न अशक्य नाही हा दिलासा देणारे आहेत. स्त्रियांबाबतच्या वाढत्या हिंसाचारामागे विशिष्ट अशी पुरुषी मानसिकता आणि पुरुषी अहंकार कारणीभूत आहे, ही जाणीव तरुणांमध्ये रुजवून त्यांच्या विचारांना विधायक दिशा देण्याचं काम या कार्यशाळांमधून हाती घेण्यात आलं होतं. सारे पुरुष जरी हिंसाचार करत नसले तरी या हिंसेबद्दल काहीच न बोलणं हेसुद्धा अयोग्यच आणि तथाकथित मर्दानगीच्या विरुद्ध जाणारंच असतं हे तरुणांवर ठसवण्याचा प्रयत्न यातून करण्यात आला. पुरुष संवेदनशील बनावा आणि स्त्रियांविषयी त्याने मनमोकळा दृष्टिकोन बाळगावा हे उद्दिष्ट तरुण वर्गाच्या समोर ठेवताना कार्यशाळांमधून वेगवेगळे प्रयोग, उपक्रम हाताळण्यात आले. गटचर्चा, पथनाट्य, भित्तिपत्रकं, मनोगतांची देवाणघेवाण अशा मार्गांचा अवलंब करण्यात आला. विशीच्या आसपासच्या वयातले तरुण यात सहभागी होणं अपेक्षित होतं, कारण त्यांना चांगली दिशा मिळाली तर उद्या ते उत्तम जोडीदार बनू शकतील, संवेदनशील मनाने स्त्रीपुरुष नात्याकडे पाहू शकतील. मुलींनी आपल्याशी मैत्री करावी असं मुलांना वाटत असतं, पण त्यासाठी चुकीचे मार्ग अनेकदा मुलं अवलंबतात, कारण पुरुषार्थाच्या विशिष्ट कल्पना त्यांच्या मनावर ठसलेल्या असतात. यात बदल व्हावा, मुलींना कमी न लेखता त्यांचा सहानुभूतीने विचार करणं, एकूणच स्त्रियाचे प्रश्न समजून घेणं आणि स्त्रीपुरुष भेदभावाचं स्वरूप नीटपणे जाणणं अशा गोष्टींचा वेध या कार्यशाळांमधून घेण्यात आला. कार्यशाळेतील ३३ जणांपैकी काहीजण आता या कार्यात उतरले आहेत.
  विशेषतः गणेश फुले, अमोल काळे, सुनील चाचड अशा विशीतल्या तरुणांची उत्तम अन् आश्वासक साथ या उपक्रमाला लाभली. गणेश फुले हा खानवळी जवळच्या फुलेगावचा. आज २४ वर्षांचा असलेला गणेश हा महात्मा जोतिबा फुले यांचा वारसा सार्थपणे सांगतो. त्याच्यात या उपक्रमाने घडवलेला बदल बघितला तरी तरुणांची मानसिकता बदलण्याच्या दृष्टीने अशी शिबिरं कशी उपयोगी पडतात हे पटून जातं. गणेश फुलेचं उदाहरण बघण्यासारखं आहे. त्याला या कार्यशाळेत गेल्यानंतर आपल्या बहिणीचे प्रश्न, तिच्या अडचणी लक्षात आल्या. बहिणीला न विचारताच तिला दाखवण्याचे कार्यक्रम घरात होत होते, त्याबद्दल त्याने आक्षेप घेतला. तिला लग्न करायचं आहे का हा विचार आधी करा, असं त्याने आपल्या आईला सांगितलं. संवाद साधून बहिणीशीही चर्चा केली. या काळात त्याला आपल्या मित्रांशीही हे सगळं बोलता येत नव्हतं. मात्र निवासी कार्यशाळेत आपल्या बहिणीला पाठवलं असतं का, तिला तिच्या मनाप्रमाणे बाहेर जाता आलं असतं का असे सवाल आपल्याला पडत होते हे मात्र त्याने एका कार्यशाळेच्या वेळी जाहीरपणे सांगितलं. अमोल काळे याचाही अनुभव पाहण्यासारखा आहे. भारती विद्यापीठातून तो आता एमएसडब्ल्यू झालाय. आपल्या बहिणीला मित्र असावेत असं वाटतं हे त्याला कळलं तेव्हा त्याला खूप राग आला होता, पण स्वतःला मैत्रिणी असाव्या असं त्याला मात्र वाटायचं. हे त्याने शिबिरातच एकदा बोलून दाखवलं. सुनील मोगर्याची फुलं विकायचा. वडील गेल्यावर शेतीची कामंही त्याने केली. बायाच फक्त घराबीहेर भांडी घासतात असं चित्र गावात असताना तो घराबाहेर भांडी घासू लागला. अनेकजणांनी, नातेवाईकांनीही त्याला नावं ठेवली, पण त्याकडे दुर्लक्ष करत तो आपल्याला पटेल ते करू लागला. वर्षभरापूर्वी त्याने मानस बहु उद्देशीय एकात्मिक संस्था काढली आहे. गावातील स्त्रियांचं सबलीकरण, बचतगटासारख्या माध्यमांमधून तो आज करत आहे. स्त्रीपुरुषांमध्ये आरोग्यविषयक जागरूकता करण्याचं काम त्याची संस्था इतर संस्थांना जोडत करत आहे. पुरुषपणाचे फायदे मुलांना मिळतात, त्याचा उपयोग स्त्रियांना उपयोगी पडेल अशा बेताने करण्याकडे  या मुलांचा कल वाढतो आहे हा एक दिलासाच आहे.
   पुरुष जागरूकतेची ही मोहीम राबवताना संवाद महत्त्वाचा असतो. फक्त मुलांच्या उपस्थितीतच संवाद पार पडत असला तरी खेळ, पथनाट्य अशा उपक्रमांमध्ये मुलींचा सहभागही असतोच. मुलांमध्ये होणाऱ्या चर्चांमध्ये, पुरुष राग आला की शिव्या का देतात, शिव्यांमध्ये विशिष्ट शब्दच का वापरले जातात, शिव्या दिल्यामुळे मनाला खरं समाधान मिळतं का इथपासून ते लैंगिक संदर्भातील विषयांपर्यंत अनेक गोष्टी येतात. पारंपरिक पुरुषी मानसिकतेची घडण का व कशी होते याचं भान यातून मुलांना येतं. लैंगिक विषयांबद्दल मुलांना कुतूहल आणि बुजलेपण असतं, अनेक भ्रमही त्यांच्या मनात असतात. एक तऱ्हेचं साचलेपण आणि बुजलेपण घेऊन ती वावरत असतात. त्यांच्या मनातल्या शंका दूर करण्याचा प्रयत्न केला जातो. पुण्यातील डॉ. अनंत साठे आणि डॉ. शांता साठे या दांपत्याचा लैंगिकतेच्या संदर्भातील प्रशिक्षणासाठी सहभाग असतो. युवामैत्री हा उपक्रम अशा रीतने खूपच प्रभावी ठरला आहे आणि मुलांच्या वर्तनात, समजुतीत बदल घडण्यास त्याने हातभार लावला आहे. जेजुरीतल्या कॉलेजमध्ये मुलींशी गैरवर्तन करणाऱ्या काही उनाड मुलांना रस्टिकेट करण्याचा मुद्दा पुढे आला होता, तेव्हा सुनील चाचडने पुढाकार घेऊन प्राचार्य महोदयांना विनंती केली की आम्हाला त्यांच्याशी बोलू द्या. या मुलांशी संवाद साधून त्याने त्यांना समजावलं की मुलींशी मैत्री करायची असेल तर हरकत नाही, तसं वाटणं स्वाभाविक आहे, पण तुमचे मार्ग चुकीचे आहेत. या मुलांनी माफी मागितली आणि आपल्या वर्तनात सुधारणा केली. यानंतर या कॉलेजातल्या मुलामुलींनी एकत्र डबा खाण्याचा नवा उपक्रम सुरू केला. परस्पर संवाद वाढवणारा हा उपक्रम होता. ही गोष्ट मुंबईपुण्याकडे कदाचित विशेष वेगळी वाटणार नाही, पण जेजुरीच्या दृष्टीने ही खूप अप्रूपाची बाब आहे.
   मुलामुलींमध्ये केला जाणारा भेदभाव मुलांच्या लक्षात येणं ही या उपक्रमातली महत्त्वाची बाब. मुलींच्या हॉस्टेलमध्ये त्यांना रात्री आठनंतर बाहेर राहता येत नाही, हेच मुलांना मात्र रात्री दहापर्यंत बाहेर राहण्याची मुभा आहे, असं का हा प्रश्न मुलांना पडला. मुलींचं घटतं प्रमाण, स्त्रियांबाबत होणारी हिंसा अशा अनेक गोष्टींचं भान मुलांमध्ये वाढलं. गणेश फुलेने एका बैठकीच्या वेळी शेतकरी आत्महत्येबाबत कारणमीमांसा करताना, आपण स्वतःला चांगला कर्तृत्ववान पुरुष सिद्ध करू शकलो नाही, हा सलही कुठेतरी अशा आत्महत्यांमागे दिसत असल्याची मांडणी केली. पीरंपरिक मानसिकतेची ओळख तरुणांना होऊ लागली आहे याच्या अशा कित्येक खुणा युवामैत्रीच्या उपक्रमामधून दिसू लागल्या आहेत. सावित्रीच्या लेकींप्रमाणे जोतिबाचे लेकही नवी ओळख, नवं भान घेऊन जीवनाला सामोरं जाताहेत हा एक मोठा दिलासाच म्हटला पाहिजे.
(२७ फेब्रुवारी २०११)


0 Comments:

Post a Comment

Subscribe to Post Comments [Atom]

<< Home