Thursday, June 30, 2011



जिन्हें नाज़ है हिन्द पर वो कहाँ हैं
   या देशात सन्मानाने जगण्याचा हक्क प्रत्येक नागरिकाला घटनेने दिला आहे. पण काहीजणांना असं वाटतं की सन्मानाना जगण्याचाच काय मरणाचा हक्कही विशिष्ट समाज घटकांना नाही. त्यांना एखाद्याने ठार मारलं तरी काही बिघडत नाही, उलट मारणाऱ्याचा मात्र सहानुभूतीने विचार व्हावा. अशा एका महाभागाने चक्क सर्वोच्च न्यायालयालाच सांगितलं की मी खून केला असला तरी जिचा खून झाला ती शेवटी एक वेश्याच होती, तेव्हा मला कोलकाता उच्च न्यायालयाने दिलेली जन्मठेपेच्या शिक्षेचा पुनर्विचार व्हावा. मूळ घटना आहे १९९९ सालातली. बंगालमधल्या बुधदेव कार्मस्कार या मनुष्याने एका वेश्येचा खून केला त्याबद्दल त्याला तेथील उच्च न्यायालयाने दन्मठेपेची शिक्षा ठोठावली होती. त्याविरुद्ध त्याने केलेल्या अर्जाची  गेल्या महिन्यात सर्वोच्च न्यायालयापुढे झाली. न्यायालयाने त्याचा अर्ज तर फेटाळलाच पण वेश्यांनाही सन्मानाने  जगण्याचा अधिकार आहे हे ठणकावून सांगितलं. शिवाय एवढ्यावरच न थांबता, सरकारने वेश्यांच्या पुनर्वसनाचा प्रश्न हाती घ्यावा आणि तांत्रिक वा व्यावसायिक शिक्षण देण्याच्या योजना आखून त्यांना आपल्या पायावर उभं राहण्यास सक्षम बनवावं असंही  म्हटलं आहे.
   आपल्या निकालात मार्कंडेय काटजू आणि ज्ञान सुधा मिश्र यांच्या खंडपीठाने म्हटलं आहे की, कोणतीही स्त्री वेश्यावृत्तीकडे आनंदासाठी वळत नसते तर तिच्यावर एक तऱ्हेची सक्ती होते म्हणून ती या वाटेला लागते. अशा  स्त्रीला जर काही तांत्रिक किंवा व्यावसायिक स्वरूपाचं प्रशिक्षण मिळाल्यास, स्वतःचं शरीर विकण्याऐवजी अशा कौशल्यांचा उपयोग करून ती उपजीविका करू शकेल. खंडपीठाने या संदर्भातील प्रतिसाद नोंदवण्यासाठी सरकारला येत्या चार मे पर्यंतची मुदत दिली आहे. याच निकालात म्हटलं गेलंय की, वेश्याही मणूस आहेत आणि त्यांच्यावर हल्ला करण्याचा किंवा त्यांच खून करण्याचा हक्क कुणालाही पोचत नाही. सरकारला मुदत देतानाच कोणत्या गोष्टी या योजनेत असाव्यात याचाही तपशील न्यायालयीन खंडपीठाने दिला आहे. त्यात कोणत्या गोष्टींचं प्रशिक्षण द्यावं इथपासून संबंधित वस्तूंसाठी बाजारपेठ उपलब्ध करण्याची जबाबदारीही सरकारने उचलावी अशा बाबींचा उल्लेख आहे. समाजाने वेश्यांचा तिरस्कार न करता त्यांच्याबाबत सहानुभूती बाळगण्याची गरजही व्यक्त करण्यात आली आहे. घटनेच्या २१व्या कलमानुसार वेश्यांनाही सन्मानाने जीवन जगण्याचा हक्क पोचतो हे आवर्जून यात नमूद केलेलं आहे. या निकालपत्रात सर्वोच्च न्यायालयाने शरदबाबूंनी आपल्या कादंबऱ्यांमध्ये सहानुभूतिपूर्वक चित्रण केलेल्या चंद्रमुखी (देवदास) आणि राजलक्ष्मी (श्रीकांत) यांचा उल्लेख केला आहे. तसंच चतुरसेन शास्त्रींच्या चित्रलेखाचा व वैशाली नगरीतील आम्रपाली या बुद्धकालीन गणिकेचाही उल्लेख करून म्हटलं आहे की अशा वेश्यांचं वर्णन चारित्र्यवान म्हणून केलं गेलंय. केरळमधली शीलावती वेश्येची कथाही प्रसिद्ध आहे. शीलावतीने एका गरीब मनुष्याला वेळ दिलेली असल्याने ती राजाला लकार देते आणि एकट्या तिच्या या पुण्याईमुळे (इतर कोणीच एकही पुण्यकर्म केलेलं नसतं) बऱ्याच काळाने पाऊस पडतो अशी काहीशी हा गोष्ट आहे.
    बाई आपल्या शरीराचा विक्रय करून  उपजीविका करते तेव्हा ती या मार्गात ढकलली गेली असते किंवा नाइलाजाने ती अनेकदा त्याकडे वळत असते. पण जणू तिलाच या व्यवसायाची आवड किंवा चटक आहे असा आविर्भाव बहुतांश  समाज घेत असतो. संबंधित प्रकरणात तर त्या माणसाने, एका वेश्येला मारलं तर काय बिघडलं या प्रकारे युक्तिवाद केला होता. संवेदनाहीनतेचा आणि क्रौर्याचा हा कळसच म्हणायला हवा. वेश्याव्यवसाय हा जगातला एक प्राचीन व्यवसाय आहे. पण म्हणून त्याचं समर्थन करण्याची गरज नाही, तसंच वेश्यांना दूषणं देऊन मोकळं होण्याचंही कारण नाही. पुरुषाच्या सुखासाठी वेश्याव्यवसायाचा जन्म झाला हे उघड आहे. कोणताही स्त्री जन्मजात वेश्या नसते. वेगवेगळ्या कारणांमुळे ती या मार्गाला लागत असते. बहुतेकदा तिला फसवून इथे आणलं जातं. अप्रतिष्ठित असा हा व्यवसाय असल्यामुळे त्यात इतर अनेक अपप्रवृत्ती आणि असभ्य बाबी शिरणार हे उघड आहे. गुंडगिरी, गुन्हेगारी यांची लागण तिथे होतेच होते. याचा बळी ठरतात त्या तिथल्या स्त्रियाच. त्यांच्यावर अधिकार गाजवणाऱ्याही अनेकदा स्त्रियाच असतात. त्या स्वतःही तिथल्या बळीच असतात. महाराष्ट्रातील आद्य विदुषी ताराबाई शिंदे यांनी आपल्या स्त्री-पुरुष तुलना या पुस्तकात वेश्याव्यवसायाबद्दलही विवेचन केलं आहे. वेश्या आपला व्यवसाय चालावा म्हणून काही गोष्टा करत असतील तर त्यासाठी त्यांना दोषी धरता येणार नाही असं सांगताना ताराबाई युक्तिवाद करतात, कोणी मनुष्य दारू अगर अफू विकण्याचा व्यवसाय करू लागला म्हणजे त्याला अस्सल मालात काय घालावे, ह्यात कोणता पदार्थ मिसळून हा माल जास्त  करावा, याचे गिऱ्हाईक कोण, त्या गिऱ्हाईकांची मर्जी खूष राखून आपला माल खपविणे वगैरे गोष्टी तो सहजी शिकतो म्हणून का तो पूर्वीचा दारूविक्याच असतो”?   
    ताराबाईंचा युक्तिवाद सडेतोड आहे. एकीकडे वेश्यांच्या दारुण स्थितीबद्दल बोलताना त्यांच्या व्यवसायाचं समर्थन करण्याकडेही पाहायला हवं. समाजात वेस्या असणं हे सामाजिक स्वास्थ्याच्या दृष्टीने आवश्यक आहे, कारण त्यामुळे कुटुंबाचं पावित्र्य टिकून राहतं असा दावा केला जातो. पण याच वेश्यांना प्रतिष्ठा मात्र नाकारली जाते. आजवर वेश्यांना गर्तेतून बाहेर काढण्यासाठी काहीच झालं नाही असं नाही, पण त्यांच्या उपजीविकेचा खरा व उत्तम पर्याय निर्माण झाल्याविना असे प्रयत्न फोलच ठरणार. वेश्यांचंही आता बऱ्याच ठिकाणी संघटन झालं आहे. कोलकात्याला प्रथम वेश्याव्यवसायातील स्त्रिया संघटित झाल्या. तिथे त्यांची आशियातील सर्वात मोठी वेश्या संघटना आहे. महाराष्ट्रातही असे प्रयत्न होत असतात. अनेकदा या महिला जाहीरपणे सांगतात की आम्ही आहोत तिथे ठीक आहोत, स्वतंत्रपणे जगत आहोत. आमचं पुनर्वसन कसलं करता.. मीना सेशू यांच्यासारख्या कार्यकर्त्या त्यांच्यासाठी झटत असतात. पण वेश्यावृत्ती करणाऱ्या साऱ्याच स्त्रियांना तिथे आनंद वाटत नाही हेही सत्यच आहे. त्यांच्यासाठी तरी त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग असायला हवा. हे क्षेत्र गुन्हेगारीचंच क्षेत्र आहे अशी भूमिका घेतली जाऊ नये. या व्यवसायात उत्तम कमाई होते आणि पैसा असला की विश्वासाने जगता येतं असा युक्तिवाद कार्यकर्त्यांकडून केला जातो. पण मग या व्यवसायात आपल्या मुलींनी जावं असं त्याचं समर्थन करणाऱ्यांना वाटतं का असा प्रश्न विचारल्यास काय उत्तर मिळेल?
   वेश्यांविषयी सहानुभूती बाळगणं, त्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी प्रयत्नशील राहणं, त्यांचे आरोग्याचे प्रश्न सोडवणं आणि त्या व्यवसायाचं समर्थन टोकाला जाऊन करणं या वेगळ्या गोष्टी आहेत. या व्यवसायाला कायदेशीर मान्यता द्यावी अशीही एक मागणी केली जाते. ज्या व्यवसायात स्त्रियांचं प्रचंड शोषण होतं, त्यांच्यावर विविध अत्याचार होतात, त्याला मान्यता देणं हे अजिबात योग्य   नाही. सज्ञान स्त्रीने वेश्याव्यवसाय स्वतःच्या मर्जीनुसार करण्यास तशीही कायद्याची आडकाठी नाहीच. उघडपणे त्याची जाहिरात होईल असं वर्तन करणं मात्र गुन्हा आहे.  देहविक्रयाच्या क्षेत्रात कसं ह्यूमन ट्रॅफिकिंग होतं आणि त्याचे आंतरराष्ट्रीय व्यवहार कसे चालतात याबद्दलच्या कहाण्याही अधूनमधून उजेडात येत असतात. मूठभर स्त्रिया या व्यवसायाला आपण निवडलं असं म्हणत असल्या तरी वास्तवात त्याला स्वातंत्र्य म्हणता येईल का याचा विचार व्हायला हवा. भलतं उदात्तीकरण करणं बरोबर नाही. तसंच हा व्यवसाय जगाच्या पाठीवरून कधीही नाहीसा होणार नाही हे मान्य करून काहीच न करणंसुद्धा उचित ठरणार नाही. वेश्यांकडे मानवी दृष्टिकोनातून मात्र अवश्य पाहिलं जावं. सन्माननीय न्यायमूर्तींनी हेच केलं आहे.  
   साहिर लुधियानवीने लिहिलेल्या एका कवितेत थोडा बदल करून प्यासा चित्रपटासाठी ती गाणं म्हणून वापरण्यात आली होती- ‘जिन्हें नाज़ है हिन्द पर वो कहाँ हैंअशा ओळी होत्या त्या. साहिरने साधना या चित्रपटासाठी लिहिलेलं औरत ने जनम दिय मर्दों को, मर्दों ने उसे बाज़ार दिया हे गाणंही अनेकांना माहीत असेल. साधनामध्ये नायक एका वेश्येला निवडलेली पत्नी म्हणून  आईला भेटवतो. अखेरीस आईला सत्य समजतंच. तेव्हा नायिका घर सोडून जायला निघते. त्यावेळी नायकाची आई तिला म्हणते, बेटी, तू माझ्या घरात सून म्हणून आलीस, आता तुला पुन्हा एक वेश्या होण्यासाठी इथून बाहेर मी कशी पाठवू”? एका मैत्रिणीने सांगितलेला अनुभव इथे आठवतो. वेश्यांच्या मुलांसाठी काम करणाऱ्या या स्त्रीचं लग्न झाल्यानेतर ती बऱ्याच दिवसांनी त्यांच्या वस्तीत गेली. तिच्या गळ्यात मंगळसूत्र नव्हतं. ते पाहून त्या बायांनी विचारलं, तेव्हा लग्न झालं म्हणून मंगळसूत्र घालणं काही आवश्यक नाही वगैरे विचार तिने त्यांना ऐकवले. त्यावर एकजण म्हणाली, आम्हाला हे असं काही मिळत नाही. तुम्हाला मिळतं म्हणून त्याची किंमत नाही लक्षात येत तुमच्या. तिची वेदना अत्यंत खरी होती. अशा वेदनेला थोडातरी उतारा मिळण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने सुचवल्याप्रमाणे सरकारने उपाय आखले पाहिजेत आणि संपूर्ण समाजाने त्यास मनापासून पाठिंबा दिला पाहिजे.
   (२० मार्च २०११)




0 Comments:

Post a Comment

Subscribe to Post Comments [Atom]

<< Home